परभणी - संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अनुदान मंजूर करून देतो, असे सांगत गावच्या पोलीस-पाटील आणि त्याच्या पत्नीने एका वृद्धाकडे तीन हजार रुपयांची लाच मागितली. या प्रकरणी मंगळवारी संध्याकाळी परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्यांनी सापळा रचून, या पोलीस-पाटील दांपत्याला लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हेही वाचा... लहान भावाचा सांभाळ की शिक्षण ? रेश्माने निवडला 'हा' पर्याय
मानवत तालुक्यातील पोहंडुळ या गावात ही घटना घडली. या गावातील एका वृद्ध व्यक्तीकडून पोलीस-पाटील लक्ष्मण उत्तमराव कोपरटकर यांनी तीन हजार रुपयांची लाच मागितली होती. सदर वृद्धाचे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अनुदान मंजूर करायचे होते. तसेच ते नियमित चालू ठेवण्यासाठी, ही लाच मागण्यात आली होती. त्यासाठी पोलीस पाटील कोपरटकर यांनी मंगळवारी संध्याकाळी लाचेची रक्कम घेऊन येण्यास सांगितले होते.
त्यामुळे वृद्धाने परभणीच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी तातडीने गावात पोलीस पाटील कोपरटकर यांच्या घरावरच सापळा रचण्यात आला. त्यावेळी कोपरकर यांची पत्नी शारदा यांच्यामार्फत हे 3 हजार रुपये स्विकारताना पोलिसांनी या जोडप्याला रंगेहात अटक केली. त्यांच्यावर मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.