परभणी - जमिनीच्या वादातून भावकी अंतर्गत झालेली केस मिटविण्यासाठी एक हजार रुपयांची लाच मागणाऱ्या गंगाखेडच्या पोलिसाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सोमवारी रंगेहाथ पकडून अटक केली आहे. एकीकडे कोरोनाच्या महामारीत अनेकांची माणुसकी जीवंत होत असतानाच अशा काही लाचखोरांनी मात्र लाज सोडली, असेच म्हणावे लागेल.
पोलीस हवालदार सुरेश बाजीराव पाटील असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. गंगाखेड पोलिस ठाण्यातंर्गत दोन भावांचे शेतीच्या वादावरून भांडण होते. यातील अमिन खान याने दुसऱ्या भावाशी शेतावरून भांडण झाल्यानंतर गंगाखेड पोलिस ठाण्यात त्या भावासह त्याचे दोन मुले व सुनेवर केस दाखल केली होती. याप्रकरणाचा तपास जमादार सुरेश पाटील करत होते. या संदर्भात पाटील यांनी ज्या भावावर केस दाखल झाली होती, त्याला 13 जून रोजी पोलीस ठाण्यात बोलावले होते. त्यावेळी त्यांनी हे प्रकरण मिटवण्यासाठी एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यामुळे या प्रकरणी त्याने परभणीत येऊन लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पथकाने आज सोमवारी सायंकाळी हवालदार सुरेश पाटील (रा.पोलिस वसाहत, गंगाखेड) यांच्या विरूद्ध सापळा रचला. या सापळ्यात एक हजार रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारताना हवालदार पाटील यांना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हा सापळा लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे निरीक्षक अमोल कडू, पोलीस नाईक अनिल कटारे, अनिरूध्द कुलकर्णी, शेख मुखीद, शकील, हनुमंते आदीच्या पथकाने यशस्वी केला.