परभणी - गंगाखेड नगरपालिकेत शिपाई म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकडून कालबद्ध पदोन्नतीचे काम करून देण्यास एक हजार रुपयांची लाच घेणाऱ्या लिपिकाला रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील तक्रारदार हे गंगाखेड नगर परिषद येथील शिपाई तथा लाईनमन म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी परभणीच्या एसीबी कार्यालयात तक्रार दिली होती. त्यांचे कालबध्द पदोन्नतीचे काम करण्यासाठी आस्थापना विभागातील कनिष्ठ लिपिक विलास किशनराव तातोडे हे लाचेची मागणी करत होते. त्यानुसार बुधवारी दुपारी गंगाखेड नगर परिषद कार्यालयात सापळा रचण्यात आला. त्यावेळी विलास तातोडे यांनी तक्रारदार यांचे कालबध्द पदोन्नतीचे काम करण्यासाठी पंचासमक्ष लाचेची मागणी करुन 1 हजार रुपये स्विकारले. त्यांना लाचेच्या रक्कमेसह पकडण्यात आले.
रक्कम त्याच्या ताब्यातुन हस्तगत करण्यात आली असून त्यांच्या विरूध्द गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कार्यवाई पोलीस अधीक्षक संजय लाटकर, अपर पोलीस अधीक्षक नूरमंहमद शेख, पोलीस उप अधीक्षक भरत हुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल गव्हाणकर, विवेकानंद्र भारती, मिलींद हनुमंते, जमील जहागिरदार, शेख शकील, अनिल कटारे, शेख मुखीद, अनिरुध्द कुलकर्णी, अविनाश पवार, सचिन धबडगे यांनी यशस्वी केली.