परभणी - गेल्या काही महिन्यांपासून अवैद्य धंदे आणि जुगार अड्डयांवर परभणी पोलिसांकडून जोरदार कारवाई केली जात आहे. गंगाखेड शहरातील मोंढा भागात हाय प्रोफाइल जुगार अड्यावर पोलिसांनी धाड टाकली. यामध्ये पोलिसांनी ७ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून, १५ जणांना अटक केली आहे.
या संदर्भात परभणी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी गुप्त माहिती मिळाली होती. त्यांनी विशेष पथकाला दिलेल्या आदेशानुसार गंगाखेड शहरातील नवा मोंढा भागातील या जुगार अड्यावर धाड टाकली. या ठिकाणी ७ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जुगार खेळणाऱ्या १५ जणांना अटक केली. नवा मोंढा भागातील न्यु साई मंडप डेकोरेशनच्या पाठीमागे बंद शटरमध्ये हा जुगार अड्डा चालु होता. येथे १५ जण वेगवेगळ्या ठिकाणी गोलाकार बसुन तिर्रट नावाचा जुगार खेळत होते.
यामध्ये बाळकृष्ण गोपाळ जाधव (वय, 32 रा पोहुंडुळ ता. सोनपेठ), भास्कर लिंबाजी जाधव (वय, ५५ वर्षे रा. पोहंडुळ ता. सोनपेठ), राजेभाऊ बाबुराव जाधव (वय, ४२ वर्षे रा. पोहुंडुळ ता. सोनपेठ), राहुल बाबाराव लोंढे (वय, २५ वर्षे रा. रमाबाई नगर गंगाखेड), सुभाष गंगाधर डमरे (वय, ४९ वर्षे रा.खडकपुरा गल्ली गंगाखेड), बालाप्रसाद ओमप्रकाश भंडारी (वय, ४० वर्षे रा. नवा मोंढा गंगाखेड), शामसुंदर वासुदेव पापंडवार (वय, ५६ वर्षे रा. गणेश नगर सोनपेठ), गोपाळ रामप्रसाद सारडा (वय, ४० वर्षे रा. सारडा कॉलनी गंगाखेड), वैजनाथ पांडुरंग पाळवदे (रा. लेक्चर कॉलनी गंगाखेड), गोविंद गुलाबसिंग राठोड, सोमेश्वर बाबुराव साखरे, हनुमंत सत्यनारायन मुंदडा व गंगाखेड शहरातील इतर तीन जणांचा समावेश आहे.
पोलिसांनी जुगाऱ्यांकडून रोख १ लाख ४६ हजार, १४ मोबाईल (किंमत १ लाख २९ हजार), ८ मोटरसायकल ( किंमत ४ लाख ६ हजार) व जुगाराचे साहित्य, पत्याचे कॅट जप्त केले आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरात करत आहेत. दरम्यान, अटक जुगारी हे गंगाखेड आणि जिल्ह्यातील इतर तालुक्यातून आलेले प्रतिष्ठित लोक आहेत. यात काही राजकारणी, वकील, व्यापारी आहेत. त्यांच्यावर कारवाई झाल्याने सामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.