परभणी - डॉक्टरकडून गेल्या २ वर्षांपासून लैंगिक शोषण होत असल्याची तक्रार एका परिचारिकेने जिल्हाधिकाऱयांकडे केली आहे. हा प्रकार जिंतूर तालुक्यातील येलदारीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या उपकेंद्र पिंपळगाव (का) येथील आहे. डॉ. तौसीफ हुसेन अन्सारी असे या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे.
या परिचारिकेने आपल्या तक्रारीत डॉ. तौसीफ अन्सारी विरुद्ध गंभीर आरोप केले आहेत. या तक्रारीत महिलेने म्हटले आहे, की येलदरी येथे मागील अडीच वर्षांपासून मी परिचारिका म्हणून काम पाहत आहे. येथे काम करत असताना डॉ. तौसीफ अन्सारी यांनी वेळोवेळी अडवणूक करत शारीरिक व मानसिक त्रास देऊन छळ केला. तसेच रात्री-बेरात्री फोन करून बोलावून शारीरिक संबंधांची मागणी केली. याला तिने नकार दिला असता नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे या डॉक्टरविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी या परिचारिकेने केली आहे.
डॉ. तौसीफ अन्सारीच्या नेहमीच्या छळाला कंटाळून परिचारिका फाशी घेणार होती. ३ जून रोजी या परिचारिकेची रात्रपाळी होती. दुसऱ्या दिवशी सुटीचा वार होता. यादिवशी डॉक्टरने दुपारी बोलावून ‘आता मला तुझी गरज नाही, माझे लग्न झाले आहे. तू आता क्वॉर्टर खाली कर', असे म्हणत परिचारिकेला मुख्यालय सोडण्याचे आदेश दिले. ते आदेश हातात घेऊन परिचारिका रडू लागली. त्यानंतर ती क्वॉर्टरमध्ये जाऊन फाशी घेण्यासाठी छताला दोर बांधत होती. याचवेळी काही लोकांनी तिला पाहिले. यानंतर पर्यवेक्षक कऱ्हाळे यांनी रोखले.
या प्रकारानंतर अन्सारीने नौकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली. ‘तु कुठेही जा, माझे काहीही होत नाही’ असेही त्याने म्हटले असल्याचे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. तिने आपल्या या तक्रारवजा निवेदनाच्या प्रती परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. पी. पृथ्वीराज, जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर, पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, औरंगाबादच्या आरोग्य उपसंचालकांना पाठविल्या आहेत.