परभणी - देशात गेल्या काही महिन्यात इंधनाचे दर पुन्हा एकदा भडकले आहेत. त्यात परभणीत दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामुळे येथील वाहनधारक आता संताप व्यक्त करताना दिसत आहेत. परभणीत आज (शनिवारी) पेट्रोल (106.57)पैसे प्रति लिटर एवढ्या दराने विक्री होत आहे. तर, डिझेल शंभरीच्या जवळ पोहोचले आहे. (96.95)पैसे या दराने डिझेलची विक्री होत आहे. दरम्यान, परभणीत गेल्या वर्षभरात पेट्रोल 26 रुपयांनी, तर डिझेल तब्बल 29 रुपये 77 पैशांनी महागले आहे. नेहमीप्रमाणे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीने परभणीतील रेकॉर्ड कायम ठेवला आहे. राज्यातील सर्वात महाग पेट्रोल सध्या परभणीकरांना घ्यावे लागत आहे.
'वर्षभरात पेट्रोल 26 रुपयांनी महागले'
गेल्यावर्षी जून महिन्यात परभणीत पेट्रोलचे दर 80 रुपये 36 पैसे प्रति लिटर एवढे होते. तर, सहा महिन्यांपूर्वी (26 नोव्हेंबर)ला 90.76 रुपये दर होते. तसेच, हे दर तीन महिन्यांपूर्वी म्हणजे, (24 फेब्रुवारी)ला 99 रुपये 43 पैसे इतके होते. मे महिन्यात पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली. काल शुक्रवारी 106.23 पैसे दर असलेल्या पेट्रोलमध्ये आज 34 पैश्यांची वाढ झाली आहे. सध्या पेट्रोल 106.57 पैसे प्रति लिटर दराने विक्री होत आहे.
डिझेलमध्ये 29.77 पैश्यांची वाढ
पेट्रोलने मागच्या महिन्यात शंभरी गाठली आहे. तर, आता डिझेलही शंभरीच्या वाटेवर आहे. डिझेलमध्येही गेल्या वर्षभरात तब्बल 29.77 पैशांची वाढ झाली आहे. गेल्यावर्षी (27 मे)रोजी परभणीत डिझेल 67 रुपये 17 पैसे, तर सहा महिन्यांपूर्वी म्हणजेच (26 नोव्हेंबर)रोजी 77.71 पैसे या दराने विक्री झाले. शिवाय तीन महिन्यांपूर्वी म्हणजे (24 फेब्रुवारी) रोजी डिझेलचा दर 89 रुपये 11 पैसे होता. तर, 26 एप्रिल रोजी 88 रुपये 5 पैसे एवढा दर झाला होता. यात पुन्हा वाढ होऊन काल (शुक्रवारी) 96.58 पैसे एवढ्या दराने डिझेलची विक्री झाली. तर, आज (शनिवारी) त्यात आणखी 36 पैशांची वाढ होऊन, हाच दर 96 रुपये 95 पैसे एवढा झाला आहे.
'परभणीकरांनाच हा फटका का?'
गेल्या काही दिवसांत देशात इंधनाचे भाव झपाट्याने वाढत आहेत. मात्र, त्यातील सर्वाधिक भाव परभणीत असल्याने नागरिक संतापले आहेत. याबाबत शहरातील एका पंपावर लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या. तेव्हा हा भावाढीचा अन्याय केवळ आमच्यावरच का? असा प्रश्न वाहनधारक उपस्थित करत आहेत. सध्या लॉकडाउनची परिस्थिती आहे. लोकांना आधीच रोजगार नाही. त्यामध्ये इंधन दरवाढीमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ सहन करावी लागत आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
डिझेल दरवाढीने मालवाहतुक महागली
पेट्रोलप्रमाणेच डिझेलच्या भावात (96.95 पैसे) वाढ झाली आहे. त्यामुळे मालवाहतुक महागली आहे. भाजीपाला, धान्य यांची दरवाढ सुरू झाली आहे. भाज्या महागल्या आहेत. धान्यांचे दरही वाढले आहेत. बहुतांश प्रवासी आणि मालवाहतुक ऑटोरिक्षा, टेम्पो, ट्रक पेट्रोल व डिझेलवर चालतात. त्यामुळे प्रवाशी वाहतुकीबरोबर माल वाहतुकीचाही खर्च वाढला आहे. याचा वाहतुक, दळणवळण, व्यापारी आणि प्रवास या सर्वांवर विपरीत परिणाम झाला आहे. हे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाही. त्यामुळे इंधन दरवाढ कमी करण्याची मागणी होत आहे.
परभणीत सर्वाधिक दराचे हे आहे कारण
परभणी जिल्ह्याला इंधनाची आवक करण्यासाठी जवळ इंधनाचा कुठलाही डेपो नाही. त्यामुळे जिह्यातील भारत पेट्रोलियमच्या पंपाना 330 किलोमीटर दूर असलेल्या मनमाड डेपोतून इंधन पुरवठा होतो. तर, हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पंपाना सोलापूर येथून पुरवठा केला जातो. या ठिकाणाहून इंधन परभणीत येण्यासाठी वाहतूकीवर मोठा खर्च होतो. परिणामी, पेट्रोल व डिझेलच्या किंमती वाढतात. त्यामुळे परभणी परिसरात किंवा जवळ असलेल्या एखाद्या मोठ्या शहरात इंधनाचा डेपो उभारावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत असते. मात्र, शासन याकडे कायम दुर्लक्ष करत आहे.