परभणी - लॉकडाऊनच्या सुरुवातीचा दीड महिना ग्रीन झोनमध्ये असणाऱ्या परभणी जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आजघडीला 67 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, तर प्रलंबित स्वॅबच्या अहवालांची संख्यादेखील झपाट्याने वाढत आहे. सुरुवातीला पाच-पन्नास अहवाल प्रलंबित राहत होते. मात्र, आजघडीला तब्बल 311 अहवाल नांदेडच्या प्रयोगशाळेत प्रलंबित आहेत. त्यामुळे त्यातील किती जण कोरोनाबाधित आहेत, त्यापैकी किती लोक क्वारंटाईन झाले आहेत, कितीजण बाहेर फिरत आहेत, त्यांच्या संपर्कात कोण-कोण आले यासह असंख्य प्रश्नांनी परभणीकरांची चिंता वाढली आहे.
परभणी जिल्ह्यात 16 एप्रिल रोजी आढळून आलेला कोरोना रुग्ण हा हिंगोली जिल्ह्यातला होता. तो हिंगोलीला जाण्यापूर्वी परभणी येथे त्याच्या नातेवाईकाला भेटण्यासाठी आला होता. दरम्यान, त्याची तपासणी केल्यानंतर तो पॉझिटिव्ह आढळून आला. त्यावेळी संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करून संचारबंदी देखील लागू केली होती. त्यानंतर तो रुग्ण ठणठणीत बरा होऊन आपल्या घरी परतला. हा अपवाद वगळता लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या दीड महिन्यात परभणीत अन्य एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेला नव्हता. मात्र, त्यानंतर गेल्या दोन आठवड्यांपासून परभणीत रेड झोनमधून येणाऱ्या लोकांमुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
आजच्या परिस्थितीत परभणी जिल्ह्यात 67 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून एक रुग्ण ठणठणीत बरा होऊन परतला आहे. सध्या 65 रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, परभणी जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 128 संभाव्य रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 1 हजार 782 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर, जिल्हा रुग्णालयाच्या संसर्गजन्य कक्षात सद्य परिस्थितीत 342 रुग्ण ठेवण्यात आले आहेत. याशिवाय विलगीकरण केलेले 523 जण आहेत. या एकूण रुग्णांपैकी विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करणाऱ्या रुग्णांची संख्या 1 हजार 262 एवढी आहे. यामध्ये परदेशातून आलेले 62 नागरिक असून त्यांच्या संपर्कातील 6 जणांचा समावेश आहे.
दरम्यान, गुरुवारी दिवसभरात तब्बल 108 नवीन रुग्ण आढळून आले असून त्याशिवाय पूर्वीच्या काही रुग्णांचे मिळून 183 स्वॅबचे नमुने नांदेड येथील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तर गुरुवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात 44 अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत. या एकूण प्रक्रियेत मात्र, 311 स्वॅबचे अहवाल प्रयोगशाळेत प्रलंबित आहेत. सुरुवातीला परभणी जिल्ह्यातील स्वॅबचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जायचे. त्यावेळी दहा-पंधरा निकाल प्रलंबित राहयचे. त्यानंतर औरंगाबाद येथील शासकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत तपासणी होऊ लागली. त्याठिकाणी प्रलंबित अहवालांचा आकडा वाढून वीस-पंचवीस वर पोहोचला. त्यानंतर गेल्या महिनाभरापासून नांदेड येथील गुरुगोविंदसिंग शासकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत परभणीतील कोरोना संभाव्यांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. याठिकाणी देखील सुरुवातीला वीस-पंचवीस अहवालांचा निकाल प्रलंबित राहत होता. आता त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, सध्या परिस्थितीत तब्बल 311 अहवाल प्रलंबित आहेत.
गेल्या दोन आठवड्यात वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे या प्रलंबित अहवालाच्या निकालात कितीजण बाधित सापडतील, याची सर्वांना चिंता लागली आहे. त्यातच जिल्हा रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनाच कोरोनाची लागण होत आहे. शिवाय पोलीस दलातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यात पुणे, मुंबई, औरंगाबाद आदी रेड झोनमधून येणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या प्रलंबित अहवालांमध्ये किती लोकांना क्वारंटाईन केले हा प्रश्न आहे. शिवाय ते लोक जर बिनधास्त फिरत असतील तर त्यांच्या संपर्कात कोणकोण आले किंवा त्यांच्या स्वॅबचे नमुने घेण्यापूर्वी ते कोणा-कोणाच्या संपर्कात आले, हाही महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे जेवढे अहवाल प्रलंबित राहतील, तेवढी बाधितांची संख्या वाढण्याची भीती आहे.
दरम्यान, परभणीत शिसोदिया पॅथॉलॉजी लॅबच्या सहकार्याने जिल्हा रुग्णालयात कोरोनाची तपासणी करण्यासाठी यंत्रणा उभी केली आहे. मात्र, या ठिकाणी जास्तीत जास्त 30 नमुन्यांची तपासणी होऊ शकते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून या ठिकाणची यंत्रणा सुरू असली तरी त्या तपासण्याबाबत जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरच साशंक आहेत. संशय आल्यानंतर त्या स्वॅबचा नमुना पुन्हा नांदेड येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येतो. त्यामुळे परभणीत अजून पूर्ण क्षमतेने तपासण्या होत नाही, अशी माहिती सहाय्यक शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश डाके यांनी दिली आहे.