परभणी - मराठवाडा दौऱ्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साईबाबांचे जन्मस्थळ असलेल्या पाथरी शहराच्या विकासासाठी 100 कोटी रुपयांचा निधी देण्याचे घोषित केले. मात्र त्यानंतर शिर्डीकरांनी याचा जोरदार विरोध केला. इतकेच नाही तर, रविवारपासून बेमुदत बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज सोमवारी मुंबईत संबंधितांची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीचे पाथरीकरांना निमंत्रण नाही. त्यामुळे आता पाथरीकर उद्या मंगळवारी सर्वपक्षीय बैठक घेऊन पुढील दिशा ठरवणार आहेत.
हेही वाचा... साई जन्मभूमी वाद : शिर्डीकरांचा आंदोलन मागे घेण्याचा निर्णय
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरीला साईबाबांचे जन्मस्थळ म्हटल्याने शिर्डीकरांचा पारा चढला. त्यांना साईबाबांचे जन्मस्थळ पाथरी असल्याचे मंजूर नाही. त्यामुळे पाथरीला साईबाबांची जन्मभूमी म्हणू नये, म्हणून शिर्डीवासियांनी रविवारी मध्यरात्रीपासून बेमुदत बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर पाथरीत देखील सोमवारी बंद पुकारण्यात आला होता. परंतु व्यापाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर मंदिर कृती समितीने हा बंद मागे घेत, मंगळवारी सर्वपक्षीय नेते आणि लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहे, अशी माहिती कृती समितीचे अध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी दिली.
हेही वाचा... 'ईटीव्ही भारत' इम्पॅक्ट; 'त्या' मुलाची मंत्री धनंजय मुंडेंनी घेतली दखल
सोमवारी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधितांची बैठक बोलावली असल्याने सोमवारचा देखील बंद मागे घेतला. मात्र, त्या बैठकीला पाथरीकरांना निमंत्रण दिलेले नाही. त्यामुळे आता पाथरी येथील रहिवाशी आणि मंदिर कृती समितीचे पदाधिकारी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.