परभणी - सध्याच्या परिस्थितीत जनतेला काहीतरी विरंगुळा देण्यासाठी आणि 'कोरोना'चे दडपण कमी व्हावे, म्हणून अनेकजण विविध गाण्यांच्या माध्यमातून व शाहिरी अंदाजात 'कोरोना'चे वर्णन करत आहेत. या गंभीर परिस्थितीचे प्रत्येकजण आपल्या अंदाजात वर्णन करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता हे सर्व झाल्यानंतर परभणीचे शिक्षक सतिश वाघमारे यांनी 'कोरोना' वर चक्क पाळणा गायला आहे. हा वैशिष्ट्यपूर्ण पाळणा "ईटीव्ही भारत" च्या प्रेक्षकांसाठी आम्ही या ठिकाणी सादर करत आहोत.
संपूर्ण जगाला हदरवून सोडणार्या कोरोना विषाणूच्या दहशतीने सर्वांचेच मन हेलावून गेले आहे. या परिस्थितीचा सामना कशा पद्धतीने करावा, याबाबत शासन आणि प्रशासन आपल्या परीने प्रचार आणि प्रसार करत आहेत. शिवाय सामान्य जनतेतील सुज्ञ नागरिक देखील विविध माध्यमातून जनजागृती करत आहेत. यापूर्वी परभणीत एका पोलिसाने शायरी अंदाजात कोरोना बाबत गीत गायले आहे. शिवाय अनेकांचे भारुड, कीर्तन आणि प्रवचन देखील समाजमाध्यमातून व्हायरल झाले आहेत. आता त्यात परभणीच्या शिक्षकाने गायलेल्या पाळण्याची भर पडली आहे. मात्र सध्यातरी हा पाळणा कुठल्याही समाजमाध्यमातून तुम्हाला दिसणार नाही. तो फक्त "ईटीव्ही भारत" वरच पाहायला मिळणार आहे.