परभणी - जिल्ह्यातील पाथरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबजानी दुराणी यांच्या फार्म हाऊसवर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती निवडी संदर्भात आज बैठक पार पडली. महाविकास आघाडीच्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांसह भाजपचे सदस्य देखील उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या आमदारांनी सर्व पक्षांच्या सदस्यांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. मात्र यात ते किती यशस्वी होतात, हे मंगळवारी (7 जानेवारी) अध्यक्ष निवडीच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.
या बैठकीत काँग्रेस आमदार सुरेश वरपूडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबजानी दुराणी, माजी आमदार विजय भांबळे, शहर जिल्हाध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के, शिवसेना आमदार डॉ.राहुल पाटील, जिल्हाप्रमुख विशाल कदम, माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद अनेराव यांची प्रमुख उपस्थिती होती. विशेष म्हणजे या बैठकीला जिल्हा परिषदेचे सर्वच्या सर्व ५४ सदस्य हजर होते.
मंगळवारी परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड होणार आहे. या निवडीच्या मोर्चे बांधणीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सदस्यांची मने वळविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. यंदा देखील राष्ट्रवादीचाच अध्यक्ष व उपाध्यक्ष होण्याची चिन्हे आहेत. कारण 54 सदस्यांच्या परभणी जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे 24, शिवसेनेकडे 13, काँग्रेसकडे 6, भाजपचे 3, घनदाट मित्र मंडळ 3, अपक्ष 2 आणि रासपचे 3 सदस्य आहेत. त्यामुळे अध्यक्ष किंवा उपाध्यक्षांच्या निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ चार सदस्यांची आवश्यकता आहे. मागच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपने पाठिंबा दिला होता. त्यानंतर काँग्रेस आणि शिवसेनेने देखील विरोध न दर्शवता राष्ट्रवादीचा अध्यक्ष निवडला. यावेळी देखील हीच परिस्थिती दिसून येत आहे.
अंतर्गत वाद मिटेल का ?
या निवडणुकीत राष्ट्रवादीला इतर पक्षांचे एकवेळ समर्थन मिळेल. मात्र प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गतच आमदार बाबाजानी दुर्राणी आणि माजी आमदार विजय भांबळे यांचे दोन गट एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या मते अध्यक्षपदासाठी माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांच्या मातोश्रींना संधी दिली पाहिजे, तर भांबळे यांनी जिंतूर तालुक्यातील आपल्या गटाच्या एखाद्या उमेदवाराला संधी मिळावी, यासाठी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, आणि सर्वपक्षीय सदस्यांना एका मतावर आणण्यासाठी हे नेते यशस्वी झाले का? याचे उत्तर मंगळवारी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मिळणार आहे.