परभणी - शहरातील हॉटेल निरज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आगामी विधानसभा लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. लोकसभा निवडणुकीदरम्यान परभणी जिल्ह्यातील अनेक नेते वंचित बहुजन आघाडी जोडले गेले होते. या पदाधिकाऱ्यांसह पाथरी, परभणी, गंगाखेड आणि जिंतूर या चारही मतदारसंघातील अनेक इच्छुक उमेदवार यावेळी मुलाखतीसाठी आले होते.
मुलाखतीसाठी इच्छुक उमेदवारांची लक्षणीय उपस्थिती
वंचितकडून घेण्यात आलेल्या मुलाखतींना जिल्ह्यातील अनेक इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने आले होते. जिल्हाभरातील 68 इच्छुक उमेदवारांनी आपणच कसे सक्षम उमेदवार आहोत हे पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्यांपुढे पटवून देण्याचा प्रयत्न केला.
वंचितांना प्राधान्य देणार
वंचितकडून उमेदवारी देताना आम्ही वंचितांना प्राधान्य देणार आहोत. सोबतच तो उमेदवार निवडून येणाराही असला पाहिजे, यालाही प्राधान्य असणार आहे. सुशिक्षित, चारित्र्यसंपन्न, राजकारण आणि समाजकारणाची नाळ जोडलेला उमेदवार निवडला जाईल. असे अण्णासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले आहे.
मुलाखतीच्या प्रक्रियेतून गेलेल्या उमेदवारालाच उमेदवारी - अण्णासाहेब पाटील
आमच्याकडे अन्य पक्षातील बरेच उमेदवार इच्छुक आहेत. ते देखील मुलाखतीच्या प्रक्रियेतूनही जात आहेत. त्यामुळे अन्य कुठल्याही पक्षाचा वरून टपकला किंवा इकडून-तिकडून आला म्हणून त्याला थेट उमेदवारी मिळणार नाही. सर्वांना मुलाखतीच्या प्रक्रियेतून जावेच लागेल, असे यावेळी पाटील यांनी स्पष्ट केले.
![parbhani vanchit bahujan aghadi conducted candidat interview](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3956596_b.jpg)
वंचित बहुजन आघाडीचे सरकार येणार
आमच्याकडे पुढच्या पन्नास वर्षांची ब्ल्यू प्रिंट आहे. बाळासाहेब आंबेडकरांकडे शेतकऱ्यांसाठीचे धोरण आहे. ते दलित असून वंचितांना न्याय देण्यासाठी लढत आहेत. तसेच वंचित बहुजन आघाडीचे सरकार येणार असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.
पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्य तथा महिला आघाडी प्रमुख रेखा ठाकूर, पक्षाचे नेते किशन चव्हाण, अशोक सोनवणे, अण्णासाहेब पाटील, डॉ. धर्मराज चव्हाण, लोकसभेतील उमेदवार आलमगीर खान, सुरेश शेळके आदी नेते यावेळी वंचित बहुजन आघाडीचे निरीक्षक म्हणून उपस्थित होते.