परभणी - येथील शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराजी व्यक्त करत आपल्या पदाचा राजीनामा शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. या राजीनामा पत्रात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय पक्षवाढीसाठी वारंवार आपण काही मागण्या करूनही त्या पूर्ण होत नसल्याचेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
खासदार यांच्या राजीनाम्याची बातमी पसरताच त्यांच्या घरासमोर काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती.
विशेषतः खासदार संजय जाधव यांनी आपल्या राजीनाम्यात परभणी जिल्ह्यातील जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर नेमण्यात आलेल्या अशासकीय प्रशासकाच्या नियुक्तीवरुन आपली नाराजी व्यक्त केली आहे. जिंतूर मतदार संघावर विरोधीपक्ष असलेल्या भाजपचा आमदार असताना देखील या ठिकाणी शिवसेनेला प्रतिनिधित्व मिळत नाही. दोन वेळा जिंतूर बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रशासकाची नियुक्ती झाली आहे. तसेच अनेक पक्षातील कार्यकर्ते शिवसेनेत येण्याचे इच्छुक आहेत. मात्र, शिवसेनेत असलेल्या कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकत नसल्याने इतर पक्षातून आलेल्या कार्यकर्त्यांना कसा न्याय देणार म्हणून आपण पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम देखील थांबविल्याचे त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.
हे पत्र त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मंगळवारी (25 ऑगस्ट) दिले आहे. बुधवारी (26 ऑगस्ट) खासदार संजय जाधव हे आपल्या परभणीतील निवास्थानी परतले आहेत. त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता आपण पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतरच माध्यमांकडे आपली प्रतिक्रिया देऊ, असे ते म्हणाले.
मात्र, कॅमेऱ्यासमोर त्यांनी अधिकृतरित्या बोलण्यास नकार दिला. दरम्यान, राजीनाम्याची बातमी समजताच खासदार संजय जाधव यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी जमली आहे.
हेही वाचा - 'वीज महावितरण'च्या भोंगळ कारभाराची चौकशी करा, खासदार संजय जाधवांची मागणी