परभणी - बँकेत पैसे काढण्यासाठी किंवा भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना पटण्यासारखी कारणे देऊन हातचालाखीने त्यांच्याकडील पैसे काढुन घेणाऱ्या भामट्याला पोलिसांनी अटक केली आहे. ही कामगिरी परभणी पोलिसांनी पुणे येथे सापळा रचून केली आहे. या भामट्याने परभणी, पाथरी, सेलू तसेच कोल्हापूर येथील बँकांमध्ये आपले प्रताप दाखवले आहेत.
आरोपी सरफराज मानु ईराणी (वय ४३ वर्षे, रा. इराणी वस्ती, पाटील इस्टेट शिवाजी नगर, पुणे) याला नवा मोंढा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पोलीस त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत.
पाथरी येथील वाल्मिकी बँकेत आलेल्या ग्राहकाकडून २० हजार ५०० रुपये, सेलूच्या स्टेट बँक ऑफ इंडीया येथे आलेल्या ग्राहकाकडून १५ हजार आणि परभणी शहरातील नवामोंढा भागातील स्टेट बँकेत आलेल्या ग्राहकाकडून ३५ हजार रुपये हातचलाखीने व पैसे मोजण्याचा बहाणा करुन काढून घेतल्याच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणात फसवणूक झालेल्या ग्राहकांच्या तक्रारीवरुन परभणीच्या नवामोंढा सह विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने या प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी इतर कुठल्या जिल्ह्यात अशा प्रकारचे गुन्हे घडलेत काय ? याचा शोध घेण्यात आला. यात बँकेत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पहाणी करण्यात आली. या घटनेच्या अनुषंगाने पुणे पोलीसांशीसुध्दा संपर्क साधून आरोपीबाबत माहिती घेण्यात आली. त्यावरुन एक इराणी व्यक्ती संशयीत म्हणून समोर आला. त्याबाबत खात्री करण्यासाठी पथकाने पुण्यातून एक संशयीत इराणी व्यक्तीला सापळा रचून ताब्यात घेतले. त्यास परभणी येथे आणून गुन्ह्याबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने कोल्हापूर येथे गुन्हा केला असल्याची कबुली दिली. तसेच परभणी जिल्ह्यात त्याच्या साथीदाराच्या सोबत त्याने १६ आणि १७ जुलै रोजी वरील गुन्हे केल्याचे सांगीतले. आरोपीकडून २० हजार रुपये हस्तगत करण्यात आले. पुढील तपासासाठी आरोपी सरफराज ईराणी यास नवा मोंढा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर या गुन्ह्यात सहभागी त्याच्या साथीदार आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
दरम्यान, बँकेत गेल्यानंतर ग्राहकांनी रोख रक्कम हाताळतांना काळजी घ्यावी, अपरिचीत व्यक्तीपासून सावध व सजगपणे रहावे, असे अवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी केले आहे. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक रागसुधा आर., पोलीस निरिक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुग्रिव केंन्द्रे, हनमंत जक्केवाड, निलेश भुजबळ, जमीर फारूखी, सयद मोईन, सय्यद मोबीन, अरुण कांबळे, शिवशंकर गायकवाड यांनी केली आहे.