परभणी - शहरातील भीम नगर परिसरातील एका घरातून सुमारे 36 किलो गांजा स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून जप्त केला आहे. या गांज्याची किंमत एक लाख दहा हजार रुपये एवढी आहे. या प्रकरणात तीन गांजा तस्कर महिलांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील एक पुरुष आरोपी फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून परभणी शहरात गांजा विक्रीसाठी येत होता. मात्र, प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या हाती लागत नव्हते. त्यामुळे पोलीस या गांजा तस्करांचा शोध घेत असतानाच याप्रकरणी पोलीस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय यांना माहीती मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांनी शहरातील भीमनगर परिसरात गांजातस्कर अंजनाबाई लक्ष्मण गवारे या महिलेच्या राहत्या घरी प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश एकबोटे यांच्या मार्गदर्शनात छापा मारला.
या ठिकाणी घराच्या अंगणात संरक्षण भिंतीच्या आतील प्लास्टीकच्या ड्रममध्ये ३६. ८६ कि.ग्रॅ. वजनाचा हिरवट काळ्या रंगाचा उग्र वासाचा ओला सुका गांजा सापडला. या गांजाची किंमती १ लाख १० हजार ५८० रुपये आहे. गांजाची पोलीसांनी शासकीय पंचासमक्ष जप्त केलेला आहे. याबाबत अंजनाबाई गवारे हिची चौकशी केली असता, 'अंजनाबाईचा मुलगा प्रल्हाद लक्ष्मण गवारे याने 9 जुलैला रात्री 8 वाजता हा गांजाचा साठा वाहतूक करुन आणला होता. तो साठा अंजनाबाई लक्ष्मण गवारे, प्रल्हाद लक्ष्मण गवारे, रुख्मीनीबाई नागोराव गाडे, पोर्णीमा ऊर्फ भुरी ईश्वर गायकवाड (सर्व रा. भिम नगर, परभणी) यांचा असल्याचे निष्पन्न झाले. हे सर्वजण मिळून या गांजाची बेकायदेशीररित्या विक्री करत असल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी तिन्ही महिला आरोपींना अटक करण्यात आली असुन प्रल्हाद गवारे हा फरार झाला आहे. त्याच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे.
या प्रकरणी कलम २० (ख), २५ व २९ अंमली औषधी द्रव्य प्रदार्थ अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गांजा विक्रीच्या रॅकेट मध्ये काही मोठे मासे असण्याची शक्यता असून त्या दृष्टीने कोतवाली पोलीस तपास करत आहेत. ही कारवाई उपनिरीक्षक प्रकाश कापुरे, किशोर नाईक, सुनिल गोपिनवार, चट्टे, तुपसमिंद्रे, मुलगिर, लक्ष्मीकांत धृतराज, हनुमंत जक्केवाड, दिलावर पठाण, सय्यद मोईन, परमेश्वर शिंदे, शेख अजहर, सारिका धोत्रे यांनी केली.