परभणी- जिल्हा पोलिसांनी टाळेबंदीच्या चार महिन्यांच्या काळात जिल्ह्यातील गुटखा, दारू आणि वाळूमाफियांसह जुगारअड्डे आणि इतर गुन्हेगारांवर कारवाई करत तब्बल 8 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी 663 गुन्हे नोंदवत 1 हजार 400 हून अधिक आरोपींना गजाआड केले. एकीकडे समाजात पसरलेल्या कोरोनाच्या संसर्गाची आरोग्य आणि पालिकेची यंत्रणा सफाई करत असताना दुसरीकडे पोलिसांकडून गुन्हेगारांची सफाई होताना दिसत आहे.
परभणी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखा तसेच विशेष पथकांच्या माध्यमातून या कारवाया करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील गोदावरी, पूर्णा, दुधना या नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी होते. या वाळू तस्करीला तसेच चोरट्या वाहतुकीला आळा बसण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या. विशेष म्हणजे टाळेबंदीच्या चार महिन्यात वाळू माफियांसंदर्भात 48 गुन्हे दाखल करण्यात आले. यातून तब्बल 5 कोटी 54 लाख 73 हजार 850 रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या धाडसी कारवायांमुळे वाळू माफियांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात विविध ठिकाणी चालणाऱ्या मटका, तिर्रट आदी जुगार अड्ड्यावर कारवाई करत पोलिसांनी 96 गुन्हे दाखल केले. यात 545 आरोपींना अटक करुन त्यांच्याकडील 45 लाख 27 हजार 479 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर दारुबंदी कायद्यान्वये केलेल्या कारवाईत 452 गुन्हे नोंदविताना 568 आरोपींना बेड्या ठोकल्या. तर या कारवायांत 89 लाख 48 हजार 667 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्रत्यक्षात राज्यात तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा बंदी आहे. तरी जिल्ह्यात सर्वत्र या वस्तू उपलब्ध होतात. त्यामुळे पोलीस दलाच्या वतीने गुटख्याच्या चोरट्या वाहतुकीला आळा घालण्यासाठी करण्यात आलेल्या या कारवाईत 62 गुन्हे दाखल झाले आहेत. तर 124 आरोपींना या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून 95 लाख 9 हजार 920 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर अवैधरित्या शस्त्र बाळगल्या प्रकरणी पोलीस दलास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून 6 आरोपींना गजाआड केले.
जीवनावश्यक वस्तू अधिनियामंतर्गत टाळेबंदीच्या काळात परभणी पोलिसांनी 3 गुन्हे दाखल करून 14 लाख 25 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करतानाच 8 जणांना बेड्या ठोकण्याची कारवाई केली. या सर्व कारवाया टाळेबंदी दरम्यानच्या चार महिन्यातील असून जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत याबाबतचे गुन्हे दाखल झाले आहेत. ज्यामुळे जिल्हाभरातील माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
पोलीस दलातील भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर ही कारवाई
चार महिन्यांपासून सुरु असलेल्या टाळेबंदीत परभणी जिल्हा पोलीस दलाने केवळ गुटखा, दारू आणि वाळू माफियांवरच कारवाई केली, असे नाही तर या माफियांना मदत करणाऱ्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांवर देखील कडक कारवाई केली आहे. जिंतूर येथे दारू माफियाला सहकार्य करणाऱ्या 2 सहाय्यक उपनिरीक्षकांना सेवेतून थेट बडतर्फ केले. तर सुमारे 10 कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित केले आहे. शिवाय लाचलुचपत विभागाच्या कारवाईत रंगेहात पकडलेल्या गंगाखेडच्या कर्मचाऱ्याला देखील सेवेतून बडतर्फ केले. तसेच काहींवर तडकाफडकी बदल्यांची कारवाई सुद्धा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी केली आहे.