परभणी - केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी विविध पक्ष संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला परभणी जिल्ह्यात आज (मंगळवारी) 100 टक्के प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे, शहरातील मोठ्या दुकानांसह भाजीपाला, फळ विक्रते, हातगाडीवाले आणि दूध विक्रेत्यांनीही या बंदमध्ये सहभाग घेतल्याचे पाहावयास मिळाले. भाजप वगळता अन्य जवळपास सर्वच पक्ष, संघटनांनी या बंद मध्ये सहभाग नोंदवला. यावेळी शेतकरीविरोधी कायदे तत्काळ रद्द करावेत, शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमीभाव द्यावा, यासह इतर मागण्यां यावेळी करण्यात आल्या. रॅली काढून घोषणा देत कार्यकर्त्यांनी संपूर्ण शहर दणाणून सोडले.
येथील मुख्य बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष, कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना यासह अनेक पक्ष आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार निदर्शने देखील केल्याचे दिसून आले.
'लहान दुकाने, टपऱ्या, भाजीपाला विक्रेत्यांचाही सहभाग'
या बंदमध्ये परभणी शहर आणि तालुका ठिकाणच्या बाजारपेठेत असलेली मोठी दुकाने तर बंद राहिली. मात्र, सोबतच लहान दुकाने, पानटपऱ्या, भाजीपाला फळविक्रेत्यांनी देखील उत्स्फूर्त सहभाग घेऊन बंद पळला. ज्यामुळे परभणी शहरातील विद्यापीठ गेट परिसर, क्रांती चौक, गांधी पार्क, शिवाजी चौक, अष्टभुजा देवी चौक, पेडगाव रोड आदी भागातील किरकोळ बाजारपेठेत कडकडीत बंद राहिल्याने मोठा शुकशुकाट दिसून आला.
हेही वाचा - शेतकरी आंदोलन : शरद पवार, राहुल गांधींसह विरोधी पक्षांचे नेते राष्ट्रपतींना भेटणार
'कार्यकर्त्यांचे मुंडन आंदोलन; हातात रुमणं-एकच मागणं'
येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या मैदानात स्वाभिमानी शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी आणि संभाजी ब्रिगेड यांच्यावतीने केंद्र सरकारचा जाहीर निषेध केला. यावेळी कार्यकर्त्यांनी मुंडन आंदोलन केले. तर 'हातात रुमणं-एकच मागणं' अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला होता.
'कृषी कायद्याची प्रत जाळून केला निषेध'
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून पूर्णा तालुक्यातील लिमला येथील शेतकऱ्यांनी सर्व व्यवहार, प्रतिष्ठाने बंद ठेवून देशव्यापी संपात भाग घेतला. यावेळी शेतकऱ्यांनी कृषी कायद्याची प्रत जाळून मोदी सरकारचा निषेध केला. यावेळी महाविकास आघाडीचे ज्ञानोबा शिंदे, लक्ष्मणराव शिंदे, बालासाहेब शिंदे यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
किसान आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या या बंदमध्ये केवळ परभणी शहरच नव्हे तर जिल्ह्यातील मानवत, गंगाखेड, पाथरी, पूर्णा, सोनपेठ, पालम, सेलू आणि जिंतूर शहर बंद असल्याचे दिसून आले. मानवत शहरातील शिवसेना, माकप, भाकप, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेसने बंदमध्ये सक्रिय सहभाग घेतला. भारत बंदला गंगाखेड शहरातदेखील ऊत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. विविध पक्ष, संघटनांच्या वतीने भगवती चौकातून सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी मुकपणे जावून तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देत ही विधेयके रद्द करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी भाकपचे ओंकार पवार, काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद यादव, शेतकरी संघटनेचे भगवान शिंदे, राष्ट्रवादीचे श्रीकांत भोसले, शिवसेनेचे विष्णू मुरकुटे, अनिल सातपुते, शिक्षक सेनेचे बाळासाहेब राखे आदींसह बहुसंख्य पदाधिकारी सहभागी झाले होते.