परभणी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून कमी-अधिक प्रमाणात सुरू लॉकडाऊनमुळे सार्वजनिक कार्यक्रमे ठप्प झाली आहेत. ज्याचा सर्वाधिक फटका लग्न सोहळे आणि सार्वजनिक कार्यक्रमांच्या मंडपांची सजावट करणाऱ्या व्यवसायिकांना, कलाकारांना आणि कामगारांना बसला आहे. त्यामुळे या व्यवसायिकांनी आणि कलाकारांनी आज (बुधवार) प्रशासनाकडून ज्या जुनाट कायद्यांच्या आधारे लॉकडाऊन करून दंडेलशाही करण्यात येत आहे, त्याविरोधात काळा दिवस पाळून प्रशासनाचा जोरदार निषेध केला. हे आंदोलन शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील मैदानात आज दुपारी पार पडले.
व्यवसायिकांकडून घोषणाबाजी
गतवर्षी आजच्या दिवशीच अर्थात 24 मार्च रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले होते. या दरम्यानच्या काळात प्रशासनाकडून आतापर्यंत अनेक व्यवसायिकांना आणि सेवांना सूट दिली गेली. मात्र, सार्वजनिक कार्यक्रमांवरील बंदी तशीच कायम ठेवून प्रशासनाने मंडप सजावट करणाऱ्या व्यावसायिकांवर तसेच कलाकार आणि संबंधित कामगारांवर अन्याय केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळेच परभणी शहर आणि जिल्ह्यातील मंडप सजावट व्यवसायिकांनी आज 24 मार्च हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला. यावेळी सदर व्यवसायिकांनी जोरदार घोषणाबाजी करत शासन तसेच प्रशासनाचा निषेध नोंदवला.
'लॉकडाऊन'चे वर्षश्राद्ध म्हणून आजचा काळा दिवस पाळला
राजन क्षीरसागर यावेळी कामगार नेते राजन क्षीरसागर, कलाकार तथा गायक शुभम मस्के, मंडप-लाइट डेकोरेटर्स व साऊंड असोसिएशनचे अध्यक्ष सय्यद गफार सय्यद चाँद यांनी आंदोलकांच्या वतीने तीव्र भावना व्यक्त केल्या. क्षीरसागर म्हणाले, की लॉकडाऊनमध्ये पहिल्या दिवसापासून सर्व सामान्य नागरिकांचे व्यवसाय बंद आहेत. ज्यात सार्वजनिक कार्यक्रम, लग्न-सोहळे आदींसाठी मंडप सजवणारे, साऊंड डेकोरेशनवाले, कलाकार तसेच संबंधित काम करणारे गोरगरीब लोक आर्थिक संकटांना तोंड देत आहेत. दुसरीकडे लॉकडाऊन करणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांचा मात्र एक दिवसाचाही पगारात थांबला नाही. उलट त्यांना सातवा वेतन आयोग मिळतो. त्यामुळे उपचाराच्या नावाखाली गोरगरीब व्यावसायिकांवर आर्थिक हल्ला करणाऱ्या या शासनाचा आम्ही निषेध करत आहोत. लॉकडाऊनचे वर्षश्राद्ध म्हणून आज 24 मार्च रोजीचा दिवस काळा दिवस म्हणून पाळत असल्याचेदेखील क्षीरसागर यांनी यावेळी सांगितले. तर जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या आठ दिवसात कलाकार आणि लग्न सोहळे आदी कार्यक्रमात काम करणाऱ्या लोकांबाबत निर्णय न घेतल्यास आत्मदहन करण्याचा इशारा गायक शुभम मस्के यांनी दिला आहे. या आंदोलनात मंडप डेकोरेशन असोसिएशनचे उपाध्यक्ष शंकरराव तोडकर, गोविंद अग्रवाल, इब्राहिम वाहेद, आनंद मकरंद आदींसह व्यवसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आंदोलकांनी केल्या 'या' मागण्या
सिनेमागृहांना निर्बंध नाहीत, मात्र कार्यक्रमांवर बंदी लावली जाते. प्रवासी बसेसला वाहतुकीसाठी परवानगी आहे. मात्र लग्न समारंभाना 50 ते 60 व्यक्तींच्यावर परवानगी दिल्या जात नाही. प्रशासनाच्या या तर्कविसंगत कार्यपद्धतीमुळे आणि दंडेलशाहीमुळे मंडप डेकोरेशन व्यावसायिकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने सिनेमागृहाच्या क्षमतेएवढ्याच कार्यक्रमांना परवानगी द्यावी, लग्न, सोहळे आणि सार्वजनिक कार्यक्रमांवरील बंदी उठवावी, तसेच सदर मंडप डेकोरेशन व्यवसायातील हातावर पोट असणाऱ्या श्रमिकांना दरमहा 12 हजार रुपयांचा भत्ता द्यावा, बँका आणि फायनान्सच्या हप्त्यांना स्थगिती द्यावी तसेच वीजबिल, दुकानभाडे, गोदाम भाडे याचे सहा महिन्यांची भाडे माफ करावे, आदी मागण्या यावेळी सदर व्यावसायिकांनी लावून धरल्या होत्या. तसेच या मागण्यांचे निवेदनदेखील त्यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना दिले आहे.