परभणी - दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या पेट्रोल- डिझेलच्या किंमतीत परभणीने रेकॉर्ड कायम ठेवला आहे. राज्यातले नव्हे तर देशातले सर्वात महाग पेट्रोल सध्या परभणीकारांना घ्यावे लागत आहे. 'जगात जर्मनी आणि भारतात परभणी' या उक्तीप्रमाणे पुन्हा एकदा परभणी पेट्रोलच्या रेकॉर्डब्रेक किंमतीमुळे चर्चेत आली आहे. परभणी शहरात बुधवारी पावर पेट्रोल तब्बल 104 रुपये 11 पैसे प्रति लिटर दराने विक्री होत आहे. साधे पेट्रोल देखील शंभरीच्या (100.70 पैसे)वर गेले आहे. डिझेलच्या दराचासुद्धा भडका उडाला असून, डिझेल 90.67 पैसे लिटर प्रमाणे परभणीकर खरेदी करत असल्याने त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया आहेत.
निवडणुकांचा निकाल लागताच दर वाढण्यास सुरू -
पाच राज्यातील निवडणुकांमुळे स्थिरावलेले पेट्रोल-डिझेलचे दर निवडणुकांचा निकाल लागताच वाढण्यास सुरू झाली आहेत. गेल्या 5 ते 6 दिवसांत पेट्रोल व डिझेलच्या किंमती दररोज वाढत आहेत. 8 मे रोजी 100 रुपयांच्या आत असलेले पेट्रोलचे दर 9 मे रोजी 100.1 रुपये झाले त्यानंतर 10 रोजी 100.26 तर 11 रोजी 100.51 पैसे तर आज 12 मे रोजी त्यात 24 पैश्यांची वाढ होऊन 100.70 पैसे प्रति लिटर एवढा पेट्रोलचा दर झाला आहे.
हेही वाचा - पत्नीचा कोरोनाने मृत्यू, ६ वर्षांच्या चिमुकलीची हत्या करुन पतीची आत्महत्या
परभणीकरांनाच झळ का ? वाहचलकांचा संताप -
परभणीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास गेल्या काही दिवसात इंधनाचे भाव झपाट्याने वाढत आहेत. या बाबत शहरातील एका पंपावर लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हा भावाढीचा अन्याय केवळ आमच्यावरच का? असा प्रमुख सवाल वाहनचालक उपस्थित करत आहेत. सध्या लॉकडाऊनची परिस्थिती आहे. लोकांना आधीच रोजगार नाही, त्यात इंधन दरवाढीमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ सहन करावी लागत आहे, अशी भावना वाहनचालकांनी व्यक्त केली. काहींनी केंद्र सरकार पेट्रोल दरवाढीच्या माध्यमातून नागरिकांना लुटत असल्याचा आरोप देखील केला.
डिझेल दरवाढीने मालवाहतूक महागली -
पेट्रोल प्रमाणेच डिझेलच्या भावात (90.67 पैसे)देखील वाढ झाली आहे. त्यामुळे मालवाहतूक महागली आहे. भाजीपाला, धान्य यांची दरवाढ सुरू झाली आहे. भाज्या महागल्या, धान्याचे दरही वाढले, बहुतांश ऑटोरिक्षा पेट्रोल व डिझेलवर चालतात. त्यामुळे प्रवाशी वाहतुकीची दरवाढ सुरू झाली आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतुक, दळणवळण, व्यापारी आणि प्रवास यावर वितरीत परिणाम झाला आहे. ही इंधन दरवाढ रोजच होत असल्याने याचा परिणाम इतर वाहतुकीवर होत आहेत. हे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाही. त्यामुळे इंधन दरवाढ कमी करण्याची मागणी करत आहेत.
हेही वाचा - आता खासगी कंपन्या, गृहनिर्माण सोसायट्यांत होणार लसीकरण
.....म्हणून परभणीत दर जास्त -
परभणीजवळ इंधनाचा कुठलाच डेपो नाही, त्यामुळे जिल्ह्यातील भारत पेट्रोलियमच्या पंपाना 330 किमी दूर असलेल्या मनमाड डेपोतून इंधन पुरवठा होतो. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पंपाना सोलापूर येथून पुरवठा केला जातो. या ठिकाणाहून इंधन येण्यासाठी वाहतूक खर्च मोठा लागतो. परिणामी पेट्रोल व डिझेलच्या किंमती वाढतात. त्यामुळे परभणी परिसरात किंवा जवळ असलेल्या एखाद्या मोठ्या शहरात इंधनाचा डेपो उभारावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत असते. मात्र, शासन याकडे कायम दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.