परभणी - रविवारी लोकांनी उस्फुर्तपणे जनता कर्फ्यू पाळला. मात्र, दुसऱ्याच दिवशी लोकांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आपली वाहने आणली आहेत. त्यामुळे लोकांमध्ये जागृती झाल्याचे दिसून येत नाही. ज्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील महानगर पालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील शहरांमध्ये आजपासून (सोमवार) खाजगी दुचाकी-चारचाकी वाहनांसोबतच ट्रक, ट्रॅक्टर अशा जड वाहतुकीच्या वाहनांना देखील फिरण्यास बंदी करण्यात आली आहे. शिवाय शहरातील बांधकामांवर देखील गर्दी होत असल्याने बांधकामांवरही बंदी आणण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी बजावले आहेत.
या संदर्भात आज सायंकाळी अधिसूचना काढण्यात आली आहे. त्याद्वारे जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजना करण्यासाठी हे आदेश बजावले आहेत. परभणी जिल्हयातील घर, इमारती आदींचे सुरु असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी होणारी गर्दी, मनाई आदेश असतांनाही मोठया प्रमाणावर रस्त्यावर खाजगी वाहने दिसत आहेत. यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे खबरदारी म्हणून जिल्हयातील जनतेच्या आरोग्याच्या सूरक्षेच्या दृष्टिने तात्काळ आशा बांधकामास मनाई करणे आवश्यक आहे. त्यामुळे महानगरपालीका, नगरपरीषद व नगरपंचायत आणि त्याच्या पाच किलोमीटर परिसरातील सर्व बांधकाम बंद करण्यात यावीत, संपूर्ण जिल्हयातील कोणतेही चारचाकी व दुचाकी (खासगीवाहन) वाहनास अत्यावश्यक कामाशिवाय रस्त्यावर येणास मनाई करण्यात आली आहे. संपूर्ण जिल्ह्यातील कोणतीही माल वाहतूक करणारी जड वाहने व ट्रॅक्टर (आत्यावश्यक सेवा वगळता) रस्त्यावर येणास मनाई करण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी आदेश दिले आहेत.