परभणी - 'कोरोना' विषाणूने संपूर्ण जगात दहशत माजवली आहे. देशात आणि राज्यात देखील याची दहशत आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता, राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर लोकांना वारंवार सांगून देखील वाहतूक आणि प्रवास होत असल्याने परभणी जिल्हाधिकाऱ्यांनी शहरात येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या अशा दोन्ही मार्गावर बंदी आणली आहे. यासाठी जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत.
परभणी जिल्ह्यात आणि मुख्य शहरात अत्यंत गरजेच्या वाहनांनाच प्रवेश दिला जाणार आहे. तसेच तो नागरिक या ठिकाणचा रहिवासी असेल तर त्याची वैद्यकीय तपासणी करूनच त्याला परभणी शहरात घेतले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.
हेही वाचा... विमानात 'कोरोना'बाधित प्रवासी..! वैमानिकाने चक्क खिडकीतून मारली उडी
कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. याला वेळीच आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. शनिवार आणि रविवार दोन दिवस अक्षरशः कर्फ्यु लावण्यात आला होता. मात्र, त्यानंतर आज (सोमवार) सकाळी पुन्हा नागरिकांनी प्रवास आणि वाहतुकीला पूर्वीप्रमाणे सुरूवात केली आहे. परिणामी अनेक ठिकाणाहून नागरिक परभणीत दाखल होत आहेत. तसेच या ठिकाणचे नागरिक देखील बाहेर जात आहेत. यातून कोरोना प्रसार होण्याची दाट शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर लोकांच्या प्रवास आणि एकत्र येण्यावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात बोलताना जिल्हाधिकारी मुगळीकर म्हणाले की, 'कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी आपल्या जिल्ह्यातून बाहेर जिल्ह्यात नागरिक जाणार नाहीत अथवा तिकडून जिल्ह्यात येणार नाहीत, यासाठी आम्ही दक्षता घेत आहोत. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या आहेत. जिल्ह्याचे रहिवासी असतील तर त्यांना वैद्यकीय तपासणी करूनच जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार आहे. हे बंधन 31 मार्चपर्यंत असणार आहे. या दरम्यान शहरातील नागरिकांना कोणत्याही कारणाने बाहेर जाता येणार नाही. या प्रक्रियेसाठी आरटीओ, महसूल आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले आहे. या पथकामार्फत प्रत्येक चेक-पोस्टवर गाड्यांची तपासणी होणार आहे' अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.
हेही वाचा... COVID-19 LIVE : बुधवारपासून आंतरराज्यीय विमानांच्या उड्डाणांवर बंदी, केंद्र सरकारचा निर्णय..
'लोक ज्या कारणास्तव जिल्ह्यात येत आहेत, त्याची कसून चौकशी केली जाणार आहे. संबंधितांचे कारण अत्यावश्यक असेल तरच शहरात वैद्यकीय तपासणी करून प्रवेश दिला जाईल, अन्यथा नाही. अर्थात यामध्ये अत्यावश्यक सेवांची वाहने वगळण्यात आले आसल्याचे' जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
हा आदेश आजपासूनच (सोमवार) जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केला आहे. त्यामुळे प्रत्येक चेकपोस्टवर पथक रवाना होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही कारवाई झाल्यास 'कोरोना' विषाणूचा संसर्ग होण्यास मोठ्या प्रमाणात आळा बसेल.