परभणी - परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीला रविवार (आज) सुरुवात झाली आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान सोनपेठ येथील मतदान केंद्रावर किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर संतप्त जमावाने एकमेकांवर दगडफेक केली. ज्यामध्ये दोन गाड्यांचे नुकसान झाले आहे. याप्रकारामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, परभणी-हिंगोली जिल्ह्यातील १४ मतदान केंद्रावर ९१.२३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
दुपारपर्यंत झालेली एकूण मतदानाची टक्केवारी
परभणी-हिंगोली जिल्ह्यातील १४ मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरू पार पडली आहे. यात १ हजार ५७३ मतदारांपैकी १ हजार ४३५ मतदारांनी (९१.२३ टक्के) मतदाना हक्क बजावला आहे. यात परभणी येथील जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेतील मतदान केंद्रावर एकूण २३५ मतदारांनी मतदान केले आहे. तर जिंतूर १३७, सेलू ७१ पाथरी ५१, मानवत ८३, सोनपेठ ५१, गंगाखेड १२२, पालम ८७, पूर्णा १३४, हिंगोली ११४, सेनगाव ७०, औंढा ७०, वसमत १११, कळमनुरी ९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. याची टक्केवारी ९१.२३ टक्के इतकी आहे.
दगडफेकीनंतर तणाव
परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी सोनपेठच्या जिल्हा परिषद शाळेत मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. मात्र दुपारच्याच्या सुमारास काही जणांच्या मतदानावरून मतदान केंद्र परिसरात माजी आमदार व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या समर्थकात किरकोळ वाद झाला. त्यानंतर उमेदवार विटेकर आणि कदम-बोर्डीकर यांनी लक्ष घातल्याने हा वाद अधिक वाढला. प्रशासनासह पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर कार्यकर्त्यांची गर्दी कमी झाली. मात्र, मतदान केंद्राजवळ उभ्या असलेल्या काही गाड्यांवर दोन्हीबाजूच्या समर्थकांनी केलेल्या दगडफेकीत दोन गाड्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर सोनपेठ पोलिसांनी ताफ्यासह घटनास्थळी पोहचून पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ केली.
हेही वाचा-अँटिलिया प्रकरणाच्या तपासात केंद्राने हस्तक्षेप करावा, अनेक नावे पुढे येतील - राज ठाकरे