परभणी - जिल्ह्यातील 498 ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, या निकालाची उत्सुकता उमेदवारांसह ग्रामस्थांना लागली आहे. परभणी शहरातील कल्याण मंडपम याठिकाणी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींच्या मतदानाची मोजणी होत आहे. याप्रमाणेच जिल्ह्यातील जिंतूर, सेलू, पालम, गंगाखेड, मानवत, पूर्णा, पाथरी, सोनपेठ आदी तालुक्याच्या ठिकाणी तहसील परिसरात ही मतमोजणी होत असून, त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी झाल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान झाल्यानंतर आज (सोमवार, 18 जानेवारी) सकाळी 8 वाजल्यापासून सर्व तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. परभणीत कल्याण मंडपम इमारतीत मतमोजणी सुरू असून निकाल जाणून घेण्यासाठी उमेदवारांच्या समर्थकांसह कार्यकर्त्यांची सकाळपासूनच मोठी गर्दी झाली आहे.
परभणीतील 498 ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला सुरुवात दुपारपर्यंत 566 ग्रामपंचायतीचा निकाल येण्याची शक्यता -जिल्ह्यात 566 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. त्यापैकी 68 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने प्रत्यक्ष 498 ग्रामपंचायतीत 1 हजार 573 वार्डात निवडणूक झाली. यात 8 हजार 717 उमेदवारांचे भविष्य ईव्हीएममध्ये बंद झाले. विशेष म्हणजे यामध्ये 4 हजार 309 महिला उमेदवारांचा समावेश आहे. आज मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर सर्व ठिकाणचे निकाल हाती येणार आहेत.
'या' मोठ्या ग्रामपंचायतींच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष -
दरम्यान जिल्ह्यातील काही मोठ्या ग्रामपंचायतींच्या निकालांकडे मात्र सर्वांचे डोळे लागले आहेत. ज्यामध्ये परभणी तालुक्यातील झरी आणि जांब या मोठ्या तसेच राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निकालाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. याशिवाय गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव, जिंतूर तालुक्यातील चारठाणा व बोरी या महत्त्वाच्या गावांच्या निकालाकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे. महत्त्वाचे म्हणजे बोरी या ठिकाणी आमदार मेघना बोर्डीकर विरुद्ध माजी आमदार विजय भांबळे अशी अप्रत्यक्ष लढतच होताना दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांनी देखील जिंतूर, परभणी व गंगाखेड आदी ठिकाणच्या मतमोजणी केंद्राबाहेर तगडा बंदोबस्त ठेवला आहे.
अद्याप एकाही ग्रामपंचायतीचा निकाल अधिकृतपणे जाहीर झालेला नाही. तरी काही ग्रामपंचायतीच्या उमेदवारांना त्यांच्या खबऱ्याकडून मिळणाऱ्या बातम्यांमुळे मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष केल्या जात आहे, तर पराभूत उमेदवारांमध्ये नाराजी दिसून येत आहे.