परभणी - जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादक शेतकरी असून सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीमुळे त्यांना आपला कापूस विक्री करण्यास मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन ऑनलाईन लिंकच्या माध्यमातून शेतकऱ्यांची नोंदणी करून घेत आहे. यामध्ये जिल्ह्यातील 36 हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. सर्वाधिक गंगाखेड तालुक्यात 6 हजार 601 तर सर्वात कमी पूर्णा तालुक्यात केवळ 701 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदीची तारीख लवकरच सांगितल्या जाणार आहे.
![Online registration of cotton growers farmers in pharbhani](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pbn-registration-of-36-thousand-cotton-growers-7203748_24042020202955_2404f_1587740395_878.jpg)
जिल्ह्यातील शासकीय कापूस खरेदी केंद्र व कृषी उत्पन्न बाजार समितीकडे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यासाठी ऑनलाईन लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 18 एप्रिलला कार्यान्वित करण्यात आलेल्या या प्रणालीला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आज शुक्रवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 36 हजार 363 शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. सीसीआय व कॉटन फेडरेशन यांना शेतकऱ्याकडील एफएक्यू दर्जाचा कापूस खरेदी करण्याबाबत सूचित केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील परभणी तालुका- 5603, गंगाखेड - 6601, जिंतूर - 2109, पाथरी 3989, पालम - 1623, पूर्णा - 701, मानवत - 5400, सेलू - 4293 व सोनपेठ - 3044 अशी तालुकानिहाय आकडेवारी आहे.
या प्रणालीमुळे शेतकऱ्याची बाजार समितीमध्ये टोकन घेण्यासाठी होणारी गर्दी टाळण्यात जिल्हा प्रशासन यशस्वी झाले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन होण्यास मदत होऊन कोरोना विषाणूच्या संक्रमण होण्यास प्रतिबंध झाला आहे. ही लिंक 27 एप्रिलला सायंकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणीसाठी चालू असणार आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना त्यांचा कापूस विक्री करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत एसएमएस किंवा भ्रमणध्वनीवरुन कळविण्यात येणार आहे. त्यानुसार संबंधित शेतकऱ्याला कापूस विक्रीसाठी नेता येणार आहे.