परभणी - संपूर्ण देशात किमती वाढल्याने कांदा हा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. त्यामुळे आता हा कांदा गोरगरिबांना उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने पावले उचलली असून यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुका तहसीलदारांकडून काद्याची मागणी नोंदवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे लवकरच कांदा रेशन दुकानामध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
परतीच्या पावसाने राज्यात कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी उत्पादन घटल्याने कांद्याचे दर गगनाला भिडले. कांद्याचा भाव शंभर ते दीडशे रुपयांवर जाऊन पोहोचला. परभणी शहरात तसेच जिल्ह्यात हाच कांदा किरकोळ बाजारात शंभर रुपये किलो दराने मिळत आहे. हीच परिस्थिती संपूर्ण राज्यात असून यामुळे सरकारवर देखील मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे. त्यामुळे आता हा कांदा गरिबांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने पावले उचलली आहेत. रेशन दुकानमध्ये 50 ते 55 रुपये या किमतीने हा कांदा उपलब्ध व्हावा, यासाठी शासनाने आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.
अनुदानित कांदा रेशन दुकानातून वितरित करण्यासाठी प्रत्येक तालुक्यातून कांद्याची मागणी जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने मार्फत नोंदविण्याचे काम सुरू झाले आहे. यासंदर्भात प्रत्येक विभागीय महसूल कार्यालयात व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले होते. तर प्रत्येक जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांना मागणी पत्र देऊन तत्काळ कांद्याची मागणी नोंदविण्यास सांगितले आहे. त्यामुळे अल्पावधीतच शासनाकडून कांदा रेशन दुकानदारांना मार्फत गोरगरिबांना वितरित केल्या जाऊ शकतो, असे झाल्यास सध्या बाजारात 80 ते 100 रुपये किलो दराने मिळणारा कांदा लोकांना स्वस्त दरात उपलब्ध होईल. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही आणि सर्वसामान्यांना देखील दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, परभणी जिल्ह्यातील सोनपेठ, पूर्णा, पाथरी, मानवत, जिंतूर, सेलू, पालम, गंगाखेड आधी सर्व तहसीलदारांना कांद्याची मागणी नोंदविण्याच्या सूचना दिल्या आहेत, तसे लेखी पत्र बजावण्यात आले.