परभणी - काल परभणी शहरात एका देशी कट्यासह दोन जिवंत काडतूस जप्त करत पोलिसांनी एका आरोपीला अटक केली होती. त्यानंतर लागलीच दुसऱ्या दिवशी तालुक्यातील पेडगाव येथे एक गावठी देशी कट्टा आणि दोन जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या विशेष पथकाने केली असून, परभणीत अवैद्य शस्त्र आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अशी झाली कारवाई -
या संदर्भात विशेष पथकाला परभणी तालुक्यातील पेडगाव येथे एक व्यक्ती बेकायदेशीररित्या बंदूक जवळ बाळगत आहे, अशी माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने शुक्रवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास पेडगावात छापा टाकला. यावेळी जावेद खान याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून एक गावठी कट्टा व दोन जीवंत काडतूस जप्त केले. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांचा धाक राहिला नाही -
दरम्यान, परभणी शहरात मागच्या दोन दिवसांत वसमतरोड आणि उड्डाणपुलाजवळ काही भामट्यांनी दोन वाटसरूंना लुटण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यांच्या जवळचे पैसे आणि मोबाईल हिसकावून या भामट्यांनी पोबारा केला होता. यामुळे रात्रीच्या वेळी घराबाहेर पडण्यास नागरिक धजावत नाही, असे असताना परभणी पोलीस मात्र, जिल्ह्यातील वाळुचे टिपर पकडण्यात व मटक्याच्या बुक्या आणि जुगाराचे अड्डे आदीवर कारवाई करण्यात मशगुल आहेत. त्यामुळे पोलिसांचे अशा भुरट्या चोरट्यांवर दुर्लक्ष होत आहे. त्यांच्यावर वचक ठेवण्यात पोलीस कुठेतरी कमी पडत असल्याचे दिसून येते. त्यामुळेच अशा पद्धतीने अवैद्य शस्त्र बाळगण्याची हिंमत काही गुन्हेगारांकडून होत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
यापूर्वीदेखील जप्त केला देशी कट्टा -
दरम्यान, परभणीत भर रस्त्यावर लुटण्याच्या घटनांसह देशी बनावटीच्या बंदूक आढळून येत असल्याचे नागरिकांमध्ये भीतीते वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी रात्रीदेखील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी परभणी शहरातील एका नगरातून गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतूस जप्त केले होते. त्याच्यावरील कारवाई पूर्ण होत नाही, तोच आज पुन्हा एक देशी कट्टा आढळून आल्याने अवैद्य शस्त्रास्त्रांचे हे एखादे रॅकेट असावे, अशी शंका आहे.
हेही वाचा - स्पर्धा परीक्षा बंद असल्याने विद्यार्थ्यांची आत्महत्या..