परभणी - दहशतवादी संघटना 'इसिस'च्या संपर्कात असल्याच्या संशयावरून परभणीतील चार तरुणांना 2016 साली मुंबईच्या दहशतवादी पथकाने अटक केली होती. या तरुणांवर बॉम्ब बनवत असल्याचाही आरोप आहे. तसेच, काही जणांकडे याचे साहित्य देखील आढळून आले होते. दरम्यान, या चारपैकी मोहम्मद इकबाल या तरुणाविरोधात कुठलेही ठोस पुरावे न मिळाल्याने, त्याची मुंबई उच्च न्यायालयातून जामीन झाला आहे.
या चार तरुणांना केली होती अटक -
परभणीतून काही उच्चशिक्षित तरुण दहशतवादी संघटना इसिस'च्या संपर्कात असल्याचा संशय होता. त्यानुसार शोध घेतला असता, समाजमाध्यमाच्या माध्यमातून हे तरुण इसीसच्या संपर्कात असल्याचे आढळून आले होते. त्या पार्श्वभूमीवर अचानक छापे टाकून या तरुणांना मुंबईच्या दहशतवाद विरोधी पथकाने 7 मार्च 2016 रोजी अटक केली होती. यामध्ये शाहिद खान, मोहम्मद इकबाल मोहम्मद रईसोद्दीन व अब्बूबकर चाऊस या चौघांचा समावेश होता. यापैकी काही तरुणांकडे बॉम्ब बनवण्याचे साहित्य देखील आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती.
1 लाखाचे बॉण्ड, 1 लाखाची रोख अनामत -
या चारपैकी मोहम्मद इकबाल या तरुणाविरोधात दहशतवादी विरोधी पथकाला कुठलेही ठोस पुरावे सापडले नाहीत, किंवा त्याच्यावर आरोप सिद्ध होऊ न शकल्याने न्यायालयाने त्याची जामीन मंजूर केली आहे. मात्र, ही जामीन देताना न्यायालयाने एक लाखाचे बोंड आणि एक लाख रुपये अनामत रक्कम बंधनकारक केली आहे. तसेच, मोहम्मद जमान्याला दहशतवादी प्रतिबंधक विभाग मुंबई येथे पुढील एक महिना आठवड्यातून दोन दिवस व त्या पुढे दोन महिने आठवड्यातून एक दिवस अशी हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.