परभणी - महाराष्ट्राचा बळीराजा अजूनही विचारतोय की, कर्जमाफी केव्हा मिळणार? ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याची घोषणा या सरकारनं केली होती. पण ही कर्जमाफी खरोखर किती शेतकऱ्यांना मिळाली? असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारला केला.
सुरक्षा व्यवस्था भक्कम नसल्याने राज्यात गुन्हेगारी वाढली
अजित पवार यांनी सुरक्षेवरुनही सरकारला धारेवर धरले. सुरक्षा व्यवस्था भक्कम नसल्याने राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. एकट्या मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात एका रात्रीत ३ खून होतात, असे म्हणत पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा परभणीमध्ये आली, यावेळी आयोजित सभेत पवार बोलत होते.
दिवंगत आर.आर. पाटील आणि आम्ही सर्वांनी मिळून दरवर्षी 13 हजार याप्रमाणे ५ वर्षांत ६५ हजार पोलिसांची भरती केली होती. मात्र, या सरकारने पोलीस भरती राबवली नसल्याचे पवार म्हणाले.
गेल्या ५ वर्षांत परभणी, सेलू, जिंतूरमध्ये एकही कारखाना या सरकारने आणला नाही. मग हाताला कामं कसे मिळणार? आता व्यवसाय होत नाही. माल खपत नाही. ऊस, कापूस, सोयाबीनला योग्य भाव नाही. शेतकऱ्यांचे कैवारी फक्त पवारसाहेब होते. याची जाणीव शेतकऱ्यांनी ठेवली पाहिजे, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.