परभणी - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णांची व संशयित रुग्णांची संख्याही दररोज वाढत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणा सक्षमपणे राबवून कार्यक्षम करणे आवश्यक आहे. परंतू, परभणीचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे याबाबतीत कमालीचे उदासीन आहेत. त्यांना परिस्थितीचे गांभीर्य नाही, असा आरोप आता भाजपच्या पाठोपाठ शुक्रवारी राष्ट्रवादीने देखील केला आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात जिल्हा शल्यचिकित्सक नागरगोजे यांची जिल्ह्यातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के तसेच तालुकाध्यक्ष संतोष देशमुख यांनी शुक्रवारी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना हे निवेदन दिले आहे. ज्यात म्हटल्याप्रमाणे शल्यचिकित्सक नागरगोजे यांच्याकडून कोरोना वार्ड व विलगीकरण कक्षातील रुग्णांकडे दुर्लक्ष केले आत आहे. या दोन्ही वार्डात दर आठ तासांना कर्मचाऱ्यांच्या शिफ्ट बदलल्या जात असल्याने अनेक कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घालण्याची मोठी चूक त्यांच्याकडून होत आहे. शासनाने कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने फार मोठा निधी परभणीला उपलब्ध करून दिला आहे. परंतू, अजूनही अनेक कर्मचारी व रुग्णांना प्राथमिक सुविधासुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. विशेष म्हणजे शहरातील व जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, मंगल कार्यालय विलगीकरण कक्ष म्हणून वापरले जात असताना जिल्हा शल्यचिकित्सकांनी मात्र स्वत: मोठी व सुसज्ज इमारत प्रशासकीय कामासाठी आरक्षित केली आहे. आवश्यक नसताना स्वत:ला व त्यांच्या कर्मचाऱ्यांना सुसज्ज दालन स्वतंत्रपणे देण्यात आले आहेत. ही इमारत कोरोना रुग्णांसाठी रिकामी करून त्यांना प्रशासकीय कामासाठी पर्यायी जागेची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे.
तसेच जिल्हा आरोग्य केंद्रातील कोरोना विलगीकरण कक्षातून अनेक संशयित रुग्ण पळून गेले आहेत. नंतर त्यांना पकडून आणण्यात आले. या सर्व रुग्णांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडण्यात जिल्हा शल्यचिकित्सक कमी पडत आहेत. जिल्ह्यात कोरोनाच्या बाबतीत उपाययोजना करण्यापेक्षा जनतेला भिती दाखवण्याचा प्रकार आरोग्य यंत्रणेकडून होत आहे. संशयित रुग्णांचे स्वॅबचे नमुने घेण्यात व त्यांचे रिपोर्ट मिळण्यातही कमालीची दिरंगाई होत आहे. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करावा व जिल्हा शल्यचिकित्सक बाळासाहेब नागरगोजे यांना त्यांच्या पदावरून पदमुक्त करावे व त्याजागी एखाद्या उत्तम अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशी देखील मागणी जिल्हाध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के यांनी केली आहे.
दरम्यान, गुरुवारी भाजपचे जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी शल्यचिकित्सक नागरगोजे यांचे लक्ष केवळ शासनाकडून मिळणाऱ्या निधीवर असून ते कोरोना संदर्भातील उपाययोजना करण्यात सक्षम नसल्याने त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली होती.