परभणी - प्लास्टिक बंदीनंतर शहरात कारवाई करून पकडण्यात आलेल्या १० क्विंटल ५० किलो प्लास्टिक पिशव्यांचा रस्ता कामात उपयोग केला जात आहे. या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून त्याची गुरुवारी आयुक्त रमेश पवार यांनी पाहणी केली.
परभणी शहरात महानगरपालिकेच्या वतीने गेल्या काही महिन्यात मोहीम राबवून प्लास्टिक पिशव्या आणि इतर प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले आहे. या मध्ये १० क्विंटल ५० किलो प्लास्टिक पिशव्यांचा समावेश आहे. हे साहित्य कल्याण मंडपम या मनपाच्या मंगल कार्यालयात ठेवण्यात आले होते. याच भागातील रचना नगर येथे हा रस्ता होत आहे. २१२ मिटर लांबी ४ मिटर रुंदीचा हा रस्ता १७ लाख ३२ हजार रुपये खर्च करून करण्यात येत आहे.
या ठिकाणच्या हॉटमिस्क प्लँटमधील डांबरात जप्त करण्यात आलेल्या प्लास्टिक पिशव्या टाकून हा हॉटमिस्क रोड करण्यात येत आहे. मराठवाड्यात पहिल्यांदाचा असा प्रयोग परभणीत करण्यात येत असून जुन्या हॉटमिस्क रोडपेक्षा हा २ वर्ष जास्त टिकेल, अशी माहीती यावेळी अभियंत्यांनी दिली. दरम्यान, रोडच्या कामाची आयुक्त रमेश पवार, शहर अभियंता वसीम पठाण, अभियंता तेहरा, पल्लवी कंन्शट्रशचे गुत्तेदार आदींनी पाहणी केली.