परभणी - केंद्र सरकारच्या नियंत्रणाखालील कंपन्यांनी केलेली रासायनिक खतांची दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांनी दिला आहे. या संदर्भात त्यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज मंगळवारी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले आहे.
दरवाढीमुळे शेतकरी अडचणीत
परभणी जिल्हा शिवसेनेच्या वतीने हे निवेदन सादर करण्यात आले. केंद्र सरकारच्या नियंत्रणाखालील रासायनिक खत निर्मिती करणार्या सर्वच कंपन्यांनी ऐन खरिप हंगामाच्या तोंडावर अचानक सर्व रासायनिक खतांच्या किंमती भरमसाठ वाढविल्या आहेत. आधीच या ना त्या कारणाने अडचणीत असलेले तमाम शेतकरी या दरवाढीमुळे अधिकच अडचणीत सापडले आहेत.
लॉकडाऊनमुळे शेतमाल विकता आला नाही
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यावर्षी शेतकर्यांना सततच्या लॉकडाऊनचा सामना करावा लागला. लॉकडाऊनमुळे शेतकर्यांना आपल्याकडील गहू, ज्वारी, चना, तूर इत्यादी माल विकता आला नाही. अजूनही अनेक शेतकर्यांच्या घरी हा माल पडून असून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशातच केंद्र शासनाच्या अधिपत्याखालील खतांची किंमत वाढवून शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे केले आहे.
या खतांच्या वाढल्या किंमती
केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या इफको, आयपीएल, महाधन, जीएसएफसी(सरदार) या कंपन्यांनी 10:26:26, 20:20:0, 12:32:16, 15:15:15, 20:20:13, डीएपी इत्यादी रासायनिक खतांच्या किंमती प्रति बॅग तब्बल 600 ते 700 रुपयांनी वाढवल्या आहेत. यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले असून यावर्षी पेरणीसाठी खत घेता येईल की नाही, हा गंभीर प्रश्न त्यांच्यापुढे आहे. यामुळे केंद्र शासनाने लवकरात लवकर खतांच्या वाढलेल्या किंमती त्वरित मागे घ्याव्यात व शेतकर्यांना जुन्या दरानेच तेही मुबलक प्रमाणात खत उपलब्ध करून देण्यात यावे, अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देवून खतांच्या भरमसाठ भाववाढीचा शिवसेनेकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे. यावेळी माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, उपजिल्हाप्रमुख प्रा. पंढरीनाथ धोंडगे, नगरसेवक अतुल सरोदे, अर्जुन सामाले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.