परभणी - मराठवाड्यात सर्वत्र दुष्काळाचे सावट पसरले असताना शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून दूध उत्पादनाची कास धरावी. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले सर्व दूध शासकीय दूध डेअरीमार्फत खरेदी करण्यात येईल. त्यांच्या दुधाचा थेंबही वाया जाऊ देणार नाही, अशी ग्वाही आमदार डॉ.राहुल पाटील यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या अतिरिक्त दूध खरेदीस शासनाची मान्यता मिळवून देत ५ कोटी रुपयाचे अनुदान प्राप्त करून दिल्याबद्दल जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने बुधवारी पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
परभणी येथील शासकीय दूध डेअरीमार्फत दररोज केवळ २५ हजार लिटर दूध खरेदी करण्याचा आदेश आल्याने शेतकऱ्यांचे अतिरिक्त दूध खरेदी करण्यास अधिकाऱ्यांमार्फत नकार दिला जात होता. याविषयी आमदार पाटील यांनी मागील आठवड्यात दूग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांच्या पुढे हा प्रश्न मांडून निकाली काढला. त्यामुळे आता दररोज या केंद्रावर ६० हजार लिटर दूध खरेदी केले जात आहे.
दरम्यान, या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक सोपानराव अवचार, संदीप झाडे, शहरप्रमुख ज्ञानेश्वर पवार, माऊली मोहिते उपस्थित होते. तर कार्यक्रमास दूध उत्पादक शेतकरी प्रविण देशमुख, एकनाथ भालेराव, रामप्रसाद गमे, केशव माने, विठ्ठल शिंदे, ज्ञानेश्वर बोखारे, शंकर मोहिते, अनंत पठाडे, निवृत्ती काळदाते, निलेश साबळे, गणेश कान्हे, माधव लोंढे, बालाजी वाघ, पांडुरंग काळे, शुभम वाघ, माधव तिडके, अनिल देशमुख आदी शेतकऱ्यांची उपस्थिती होती.