परभणी - लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकांप्रमाणेच राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा धुराळा देखील तितक्याच जोमाने उडतो. मात्र, यामध्ये लाखो रुपयांचा चुराडा होत असतो. पण, हा सगळा अनाठाई खर्च टाळण्यासाठी ग्रामपंचायतीतील लोकांनी एकत्र येऊन सुशिक्षित, सुज्ञ आणि होतकरू उमेदवारांना संधी देऊन ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध पार पाडाव्यात, असे आवाहन करत परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील बिनविरोध ग्रामपंचायतींना तब्बल 25 लाख रुपयांचा अतिरिक्त निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. जिंतूर मतदार संघातील बिनविरोध ग्रामपंचायतींना 21 लाख रुपयांचा अतिरिक्त निधी देण्याचे आश्वासन आमदार मेघना बोर्डीकर यांनी दिले आहे.
ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका अलीकडच्या काळात प्रतिष्ठेचा विषय होत आहे. मागच्या काही दिवसात ग्रामपंचायतीच्या पदांसाठी बोली लावण्याचे प्रकार देखील उघडकीस आले आहेत. शिवाय निवडणुका म्हटल की एकमेकांचे वैरी चव्हाट्यावर येते. अंतर्गत कलहातून कार्यकर्त्यांमध्ये वादावादी, भांडण-तंटे मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे या निवडणुका बिनविरोध पार पडल्यास हा सर्व प्रकार टळून मोठ्या प्रमाणात होणारा खर्च देखील वाचण्याची शक्यता आहे. म्हणून आमदार डॉ. राहुल पाटील आणि आमदार मेघना बोर्डीकर यांनी त्यांच्या मतदारसंघातील ग्रामपंचायतींना बिनविरोध निवडणुका पार पाडण्याचे आवाहन केले आहे. त्याला किती ग्रामपंचायती प्रतिसाद देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
परभणी तालुक्यातील 'या' ग्रामपचातींमध्ये होणार आहेत निवडणुका
परभणी तालुका तथा विधानसभा मतदार संघातील पारवा, टाकळी कुं., मुरूंबा, धमार्पुरी, वांगी, नांदखेडा, सनपुरी, पांढरी, वाडी दमई, बलसा खुर्द, मिझार्पूर, साबा, जोडपरळी, राहाटी, आलापुरी पांढरी, दुर्डी, जांब, झरी, ब्राह्मणगाव, पिंगळी कोथाळा, उखळद, असोला, पिंगळी, कौडगाव, कारेगाव, तट्टू जवळा, रायपूर, मांगणगाव, धार, पाथ्रा, करडगाव, शेंद्रा, साटला, साडेगाव, पिंपळगाव टोंग, टाकळी बोबडे, मटकहाळा, कुंभारी, हिंगला, नांदगाव खुर्द, नांदगाव बुद्रूक, जलालपूर खानापूर तर्फे झरी, सावंगी खुर्द, नागापूर, नांदापूर, मांडवा आदी ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.
जिंतूर-सेलू तालुक्यातील 168 ग्राम पंचायतीची होणार निवडणूक
येत्या 15 जानेवारीला जिंतूर-सेलू विधानसभा मतदारसंघातील तब्बल 168 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात आचारसंहिताही लागू झाली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे मागली 9 ते 10 महिने शेतकर्यांसह संपूर्ण ग्रामीण भागातील लोकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच अनेकांना प्राणासही मुकावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुका आल्यामुळे प्रथेप्रमाणे गावागावांत भांडणतंटे, चढाओढ पहायला मिळणार आहे. त्यामुळे कोविड विरोधात लढणारे पोलीस, लोक प्रशासन, वैद्यकीय आरोग्य कर्मचार्यांवर फार मोठ्या प्रमाणात ताण वाढणार आहे. हे टाळायचे असेल तर प्रत्येक गावाने आपल्या ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आमदार मेघना बोर्डीकर यांनी केले आहे.
ग्रामपंचायत बिनविरोध काढण्यासाठी पुढाकार घ्या
परभणी विधानसभा मतदारसंघातील ज्या ग्रामपंचायती बिनविरोध निवडल्या जातील. त्या ग्रामपंचायतींना विकास कामासाठी अतिरीक्त निधी म्हणून 25 लाख रूपये देण्याची घोषणा आमदार डॉ. पाटील यांनी केली आहे. मतदार संघातील ग्रामपंचायतीसाठी निवडणूक न होता, त्या एकोप्याने बिनविरोध काढल्यास गावातील गटातटाचे राजकारण संपुष्टात येईल. तसेच यामुळे सर्वांच्या एकोप्याने गावचा विकास साधणे सहज शक्य होणार आहे. त्यासाठी सर्वांनी समोपचाराने एकत्र बसून आपली ग्रामपंचायत बिनविरोध काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे.
हेही वाचा - परभणीचा प्रसिद्ध उरूस यंदा भरणार नाही; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय
हेही वाचा - गर्भवती पत्नीचा खून करणार्या पतीस जन्मठेप; परभणी जिल्हा न्यायालयाचा निकाल