परभणी - जिंतूर रोडवरील नूतन विद्यालयाच्या प्रांगणावर सोमवारी पार पडलेल्या दिव्यांगांच्या शिबिरात तब्बल २ हजार ५०० अंध, मुकबधीर-कर्णबधीर व अपंग रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. आमदार डॉ. राहूल पाटील यांच्या पुढाकारातून झालेल्या या शिबिरात रुग्णांची तपासणी होऊन अपंगांना मोफत साहित्य वाटप करण्यासाठी त्यांच्या अवयवांचे मोजमाप घेण्यात आले.
भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (कानपूर), जिल्हा अपंग पुर्नवसन केंद्र (हिंगोली) व जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने पार पडलेल्या या शिबिरस्थळी रुग्णांसाठी स्वतंत्र नोंदणी कक्ष उभारण्यात आले होते. यात जिल्हा सामान्य रुग्णालय आणि शांतादेवी वेदप्रकाश पाटील वैद्यकीय महाविद्यालय हट्टा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्ण नोंदणी करून घेतली. शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्या हस्ते करण्यात आले.
२०० दिव्यांगांना व्यवसायासाठी स्कुटर, टॅब
या शिबिरात नोंदणी केलेल्या २०० दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी मोटाराईज्ड (इलेक्ट्रॉनिक) स्कुटरचे तसेच अंध विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपयोगासाठी ब्रेल टॅबचे मोफत वाटप करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी आमदार डॉ. राहूल पाटील यांनी दिली.
यावेळी व्यासपीठावर आमदार डॉ.राहूल पाटील, सह संपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश डाके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शंकर देशमुख, जिल्हा समाजकल्याण अधिकारी भोजने, तहसीलदार विद्याचरण कडवकर आदी मान्यवर उपस्थित होते.
![undefined](https://s3.amazonaws.com/saranyu-test/etv-bharath-assests/images/ad.png)