परभणी - कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने जिल्ह्यातील व्यापारी, भाजी विक्रेते, दूध विक्रेते, मटण-अंडी विक्रेते, रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मोठ्या प्रमाणात कोरोना तपासण्या होत आहेत. त्यामुळे त्यांचे हे व्यवसाय आता हळूहळू पूर्वपदावर येत असल्याने परभणीच्या जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी बाजारपेठेचा वेळ वाढवला आहे. त्यानुसार सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत बाजारपेठ उघडी राहणार असून, त्यानंतर मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू असणार आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
लॉकडाऊननंतर दीड महिना कोरोनाचा एकही रुग्ण नसणाऱ्या परभणी जिल्ह्यात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून 'कोरोना'ने अक्षरशः कहर केला आहे. पाहता-पाहता मागील दीड महिन्याच्या कालावधीत परभणी जिल्ह्यातील तब्बल 1 हजार 800 कोरोना बाधित रुग्ण झाले आहेत. गंभीर बाब म्हणजे त्यातील 90 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील मृत्युदर हा देखील चिंतेचा विषय असून, मृत्यूचे प्रमाण पाच टक्के एवढी आहे. तर बरे होण्याचे प्रमाण 50 ते 52 टक्के आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी दवाखाने देखील आता हाऊसफुल झाले आहेत.
सध्या कोरोना बाधितांना ईलाजासाठी रुग्णालयात बेड उपलब्ध होत नाहीत, अशी परिस्थिती आहे. कारण गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यातील व्यापारी, फळ-भाजी, अंडी आणि मटण विक्रेत्यांच्या रॅपिड एंटीजन कोरोना तपासण्या मोठ्या प्रमाणात केल्या जात आहेत. यातून रुग्णांची संख्या देखील झपाट्याने वाढत असून, त्याचा परिणाम परभणी जिल्ह्यात रुग्ण वाढीत झाला आहे; मात्र अशा परिस्थितीत निगेटिव्ह आढळून आलेले व्यापारी आणि विक्रेते आपले व्यवसाय पुन्हा सुरू करत आहेत. त्या व्यवसायिकांना आपला व्यवसाय पूर्ण क्षमतेने करण्यासाठी अनेक व्यापारी संघटनांकडून बाजारपेठेचा वेळ वाढवून मिळावा, अशी मागणी होत होती.
पुढील काळात मोठ्या प्रमाणात सण-उत्सव असून, या पार्श्वभूमीवर बाजारात गर्दी होऊ नये म्हणून हा वेळ वाढवणे आवश्यक देखील होते. त्यामुळे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आज संध्याकाळी आठ वाजता नवीन आदेश बजावत उद्या (शुक्रवार) पासून पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यातील बाजारपेठेचा वेळ सकाळी सकाळी 9 ते सायंकाळी 7 असा ठरवून दिला आहे. यापूर्वी बाजारपेठेचा वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत होता. त्यात दोन तासांची वाढ झाली असून, यामुळे बाजारपेठेतील गर्दी नियंत्रणात येईल, अशी अपेक्षा जिल्हा प्रशासनाला आहे.
दरम्यान, या वेळेव्यतिरिक्त संध्याकाळी 7 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी करण लागू असणार आहे. या काळात रस्त्यांवर तसेच बाजारांमध्ये किंवा घराबाहेर व्यक्ती आढळून आल्यास त्यांच्यावर कलम 188 नुसार कारवाई केली जाईल, असा इशारा देखील जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिला आहे.