परभणी - जन्मस्थळाच्या वादानंतर प्रथमच पाथरीच्या साईबाबा जन्मस्थळ मंदिरात भव्य, अशी सर्वपक्षीय महाआरती पार पडली. दुपारी बारा वाजता सुरू झालेली महाआरतीला तब्बल पाऊण तास चालली. यावेळी जिल्ह्यातीलच नव्हे तर पंचक्रोशीतील भाविक या महाआरतीसाठी आले होते. यावेळी मंदिर परिसरात साईभक्तांचा जनसागर लोटल्याचे दिसून आले.
साई जन्मस्थळाचा वाद उद्भवल्यानंतर शिर्डीकरांनी त्यास विरोध करत बंदची हाक दिली होती. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डीच्या शिष्टमंडळाला बोलावून आपण पाथरीला जन्मस्थळ नव्हे तर तीर्थक्षेत्र म्हणून निधी दिल्याचे सांगितले; मात्र, पाथरी येथील भाविकांच्या यामुळे भावना दुखावल्या आहेत. पाथरी हे साईबाबांच्या जन्मस्थळ असून आम्ही त्याच्या विकासासाठी शासनाकडे विकास आराखडा दिला होता. त्यामुळे आमची भूमिका ठाम असून त्याप्रमाणे पुढचा निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार आज दुपारी बारा वाजता खासदार संजय जाधव, आमदार बाबाजानी दुर्रानी, आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार सुरेश वरपुडकर, माजी आमदार मोहन फड, जिल्हा परिषद अध्यक्ष विटेकर यांच्यासह सर्व पक्ष पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत साईबाबांच्या मूर्तीची महाआरती करण्यात आली.
यावेळी जिल्ह्यातीलच नव्हे पंचक्रोशीतील भाविक मंदिर परिसरात जमा झाले होते. माध्यमांमधून पाथरी हे साईबाबा जन्मस्थळ असल्याची माहिती मिळाल्याने देखील अनेक साईभक्त दूरवरून या ठिकाणी आल्याचे पाहावयास मिळाले. एकूनच साई जन्मस्थळ मंदिरात भाविकांच्या प्रचंड उपस्थितीत महाआरती पार पडली. त्यानंतर हजारो भक्तांच्या उपस्थितीत प्रमुख लोकप्रतिनिधी आणि मंदिराच्या विश्वस्तांच्या बैठकिला सुरुवात झाली.