परभणी - सुरुवातीपासूनच परभणीच्या जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रात अगदी सुरुवातीला सीमा बंद करणारा परभणी हा पहिला जिल्हा होता; मात्र असे असले तरी जिल्ह्यात रेड झोन भागातून चार कोरोनाबाधित रुग्णांचा प्रवेश झाला. त्यातील तीन रुग्ण शुक्रवारी सापडले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी 25 मेपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे.
लॉकडाऊन दरम्यान सकाळी 7 ते 2 या वेळेतच नागरिकांना अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सूट देण्यात आली आहे. 'कोरोना' च्या पार्श्वभूमीवर यापूर्वी केंद्र सरकारने तीन वेळा लॉकडाऊन जाहीर केले आहे. या दरम्यान स्थानिक परिस्थिती पाहून त्या-त्या जिल्हाधिकाऱ्यांनी थोडेफार फेरबदल केले. आवश्यक तिथे कडक अंमलबजावणी देखील होत आहे. त्यानुसार यापूर्वी परभणीच्या जिल्हादंडाधिकारी दीपक मुगळीकर यांनी कलम 144 प्रमाणे 17 मे पर्यंत मनाई आदेश जारी केले होते. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या. सीमावर्ती 83 गावांमध्ये कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. मात्र असे असले तरी 4 कोरोनाबाधितांचा प्रवेश जिल्ह्यात झाला. त्यामुळे जिल्हा प्रशासन पुन्हा एकदा सतर्क झाले आहे. जिल्हयात कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार आता सोमवार 25 मे च्या रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी अर्थात लॉकडाऊन वाढविण्यात आला असल्याचे आदेश शनिवारी संध्याकाळी जारी केले आहेत.
या दरम्यान मात्र सकाळी 7 ते दुपारी दोन वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. यापूर्वीही किराणा, मेडिकल, भाजीपाला, कृषी विषयक साहित्यांची दुकाने, स्वीटमार्ट यासह इतर काही सेवा आणि आस्थापनांना सूट दिली होती. ती सूट यापुढे देखील 25 मे पर्यंत कायम राहणार आहे, असे देखील जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र असे असले तरी दुपारी 2 वाजल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत कोणीही घराच्या बाहेर पडायचे नाही. अत्यावश्यक कामाशिवाय रस्त्यावर आल्यास त्यांच्यावर पोलिसांकडून कडक कारवाई करण्याचा इशारा देखील जिल्हा प्रशासनाने दिला आहे.