परभणी - अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीच्या पतीला ठार मारल्याप्रकरणी प्रियकरास परभणी जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. न्यायाधीश ओंकार देशमुख यांनी प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा देखील सुनावण्यात आली.
परभणी तालुक्यातील उखळद येथील एका महिलेने प्रियकराच्या मदतीने अनैतिक संबंधांत अडथळा ठरणाऱ्या पतीचा 12 सप्टेंबर 2017 रोजी निर्घृण खून केला होता. या प्रकरणी उखळद येथील कैलास मल्हारी वाघमारे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी मनोहर वाघमारे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
मनोहर वाघमारे याचे गावातच राहणाऱ्या आश्रुबा वाघमारे यांच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. या संबंधांत आश्रुबा वाघमारे हे अडथळा ठरत असल्याने, प्रियकर मनोहर वाघमारे याने खुनाचा कट रचला. त्याने 12 सप्टेंबरच्या रात्री आश्रुबा झोपेत असतांना त्यांच्यावर चाकूने वार केले. यामध्ये आश्रुबा वाघमारे यांचा जागीच मृत्यू झाला.
13 साक्षिदारांचा न्यायालयात जबाब
या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश लांडगे यांनी जलद गतीने तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. अनेकवेळा सरकारी व बचाव पक्षात वादविवाद झाले. या दरम्यान न्यायालयाने एकूण 13 साक्षिदार तपासले. त्यांनी दिलेला जबाब आणि परिस्थितीजन्य पुरावा न्यालयाने ग्राह्य धरला. त्याचप्रमाणे आरोपी मनोहर वाघमारे यास जन्मठेप व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास सहा महिने सक्त मजुरीची देखील शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात जिल्हा सरकारी वकील ज्ञानेश्वर दराडे यांनी बाजू मांडली. त्यांना अॅड. आऩंद गिराम यांनी मदत केली.