परभणी - पूर्णा तालुक्यातील चुडावा येथे एका शेतकऱ्याच्या शेतातील लिंबाच्या झाडाच्या फांदीतून गेल्या आठ दिवसांपासून दुधासारखा द्रव बाहेर पडत आहे. हा प्रकार गावातील तसेच तालुक्यातील लोकांसाठी कुतूहलाचा विषय झाला आहे. हा नेमकं काय प्रकार आहे, याबाबत अजून उलगडा झाला नसल्याने त्याच्याबद्दल उलट सुलट चर्चा ऐकावयास मिळत आहेत.
चुडावा शिवारामध्ये काशिनाथ देसाई यांच्या शेतातील हा प्रकार आहे. त्यांच्या लिंबाच्या झाडावरून आठ दिवसापासून दुधासारखा पांढरा शुभ्र फेस (द्रव्य) बाहेर पडत आहे. झाडाच्या वरच्या बाजूला असलेल्या एका फांदीतून हे द्रव्य जमिनीवर सतत पडत असल्याकारणामुळे मोठा चर्चेचा विषय झाला आहे. आठ दिवसापासून पंचक्रोशीतील नागरिक, शेतकरी हा नैसर्गिक चमत्कार पाहण्यासाठी येत आहेत. काशिनाथ देसाई यांचे म्हणणे आहे की, हि निसर्गाची एका प्रकारची किमया आहे. काही लोकांच्या मते हा काहीतरी चमत्कारिक प्रकार आहे. मात्र, हा प्रकार नेमका काय आहे, याचा अद्याप उलगडा झाला नाही. हा पांढरेशुभ्र द्रवाचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे देसाई यांच्या शेतात लिंबाच्या झाडावरून जमिनीवर पडत असलेल्या पांढऱ्याशुभ्र द्रवाचा हा प्रकार चर्चेचा विषय बनला आहे.