परभणी - शेतकऱ्यांच्या पीककर्जाप्रश्नी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज (सोमवारी) सेलूच्या राष्ट्रीयीकृत बँकांबाहेर ठिय्या मांडला होता. यावेळी त्यांनी बँकांच्या व्यवस्थापनाला जाब विचारला. त्याचवेळी बँकांच्याही अडचणी समजून घेतल्या, तर शेतकऱ्यांचे प्रश्न देखील त्यांनी जाणून घेतले. मात्र, शेवटी त्यांनी बँकांना 'माणुसकी दाखवा शेतकऱ्यांची पिळवणूक करू नका', असे ते म्हणाले. तसेच तालुकानिहाय शेतकऱ्यांच्या कागदपत्रांचे आणि गर्दीचे प्रश्न सोडवण्यासाठी महसूल, पोलीस आणि बँक प्रशासनाने एकत्र यंत्रणा राबवावी, अशा सूचनाही केल्या.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतातील पिकांची पाहणी करण्यासाठी दरेकर हे कालपासून (रविवार) परभणी दौऱ्यावर आहेत. रविवारी त्यांनी जिंतूर, परभणी, पूर्णा आणि मानवत तालुक्यातील काही गावांना भेटी दिल्या. त्या भेटीत त्यांना शेतकऱ्यांची प्रामुख्याने बँकांकडून अडवणूक आणि पिळवणूक होत असल्याचे समजले. तसेच अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर दरेकरांनी आज (सोमवारी) सेलू येथील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये प्रतिनिधिक स्वरुपात भेट दिली. मात्र, या ठिकाणीही त्याच समस्या दिसून आल्याने त्यांनी बँकेच्या बाहेरच ठिय्या मांडून शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर चर्चा घडवून आणली.
यावेळी त्यांनी शहरातील तीन राष्ट्रीयीकृत बँकांच्या व्यवस्थापकांनाही बोलवले गेले. त्यांनी त्यांच्याही समस्या यावेळी जाणून घेतल्या. तसेच शेतकऱ्यांचेही प्रश्न ऐकले. त्यानंतर या संदर्भात बँक, महसूल प्रशासन आणि पोलिसांनी बँकांबाहेर होणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये किंवा कागदपत्रांमुळे त्यांचे पीक कर्ज थांबू नये, म्हणून या तीनही यंत्रणांनी एकत्र येऊन यंत्रणा राबवावी. कारण बँकांमध्ये दररोज 20 ते 25 शेतकऱ्यांच्या कर्ज प्रकरणांना मंजुरी मिळते. मात्र, बँकांनी बाहेर रोज 300 ते 400 लोकांची गर्दी होते. कोरोनाच्या काळात ही गर्दी टाळण्यासाठी योग्य यंत्रणा राबविणे आवश्यक आहे. म्हणून त्यादृष्टीने पावले उचलावीत, अशा सूचनाही त्यांनी बँक व्यवस्थापनाला केल्या.
यावेळी आमदार मेघना बोर्डीकर, जिल्हाध्यक्ष सुभाष कदम, बाळासाहेब जाधव आणि भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.