परभणी - विविध ठिकाणच्या दोन जर्दा दुकानांच्या गोदामांवर छापा टाकून पोलिसांनी जवळपास 9 लाखांचा विदेशी बनावटीचा सिगरेट साठा जप्त केला आहे. अन्न प्रशासनाच्या माध्यमातून विनापरवाना 4 लाखांचा सुपारी साठा हस्तगत झाला असून या कारवाईत दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
भारतात प्रतिबंधित असणाऱ्या महागड्या सिगारेटचा मोठा साठा असल्याची माहिती कॅन्सरग्रस्तांचा सर्व्हे करणाऱ्या मुंबईतील एका सामाजिक संस्थेला मिळाली. त्यानुसार संस्थेच्या प्रतिनिधींसह नानलपेठ व कोतवाली पोलिसांच्या मदतीने शहरातील स्टेशनरोडवरील तसेच मोंढा भागातील एका जर्दा स्टोअरवर छापा टाकण्यात आला. यावेळी 8 लाख 87 हजारांचा साठा आढळला. याप्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात विजय उत्तम पवार यांच्या फिर्यादीवरून मोहमंद आलीम युसूफ अन्सारीवर गुन्हा दाखल केला आहे. याचसोबत कोतवाली पोलीस ठाण्यात शेख शकील शेख जमील व शेख अखील शेख जमील यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या दोघांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई साहाय्यक पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्यासह नानलपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक कुंदन वाघमारे, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी केली.
याच कारवाईत नारायण चाळ भागातील भारत जर्दा व पान मटेरियल या आस्थापनेची तपासणी करण्यात आली. या ठिकाणी विनापरवाना पॅकेजिंग सुपारीचे री-पॅकेजिंग करत असल्याचे आढळून आले. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. या अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर अन्न परवान्याचा उल्लेख नसल्याचे समोर आले. संबंधित कारवाईत 4 लाख 39 हजारांचा साठा, पॅकेजिंग मटेरिअल व पॅकिंग मशिन जप्त करण्यात आले. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनचे साहाय्यक आयुक्त नारायण सरकटे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. यामध्ये अन्न सुरक्षा अधिकारी प्रकाश कच्छवे, अरुण तमडवार आणि राजू पेदापल्ली सहभागी होते.