परभणी - पावसाळ्यात दडी मारणाऱ्या पावसाने आता परतीत जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. यामुळे धरणे आणि जलसाठे भरत असले तरी पिकांचे मात्र प्रचंड नुकसान होत आहे. अनेक नदी-नाले आणि ओढ्यांना पूर आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात सरासरी 50 मिमी पाऊस पडला असून पाथरी, मानवत आणि सेलू तालुक्यात अतिवृष्टी झाली. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर स्थानिक नदी-नाल्यांना पूर आल्याने अनेक लोक अडकले आहेत. विशेष म्हणजे संपूर्ण मोसमात पावसाने दडी मारली होती. मात्र, केवळ ऑक्टोबर महिन्यात तब्बल तीनशे टक्के पाऊस पडला आहे.
२१ ऑगस्टला राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली होती. त्यानंतर ढगाळ हवामानासह तापमानात वाढ झाली होती. परंतु, आता अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे आणि बंगालच्या उपसागरावरून येणारे वारे यांचा संगम दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात होत असल्याने या भागात पावसाने जोर धरला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले होते. त्यानुसार संततधार पाऊस, ढगाळ हवामान यामुळे कमाल तापमानात मोठी घट झाली. काही दिवसांपासून ऑक्टोबर हीटचा चटकाही कमी झाला. मागील आठ दिवसापासून परभणी जिल्ह्यात पाऊस पडत आहे. ऑक्टोबर महिन्यात परतीचा तब्बल 300 टक्के पाऊस झाल्याने काढणीला आलेले सोयाबीन पूर्णपणे वाया गेले. तर वेचनीला आलेल्या कापुस बोंडातच अंकुर फुटून वाया गेला आहे. रब्बी ज्वारीचे कोवळे मोड करपून गेल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. अशा परिस्थितीत आता कृषी विभागाने पंचनामे करून शेतकऱ्यांना पिक विमा आणि शासनाने मदत देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
पाथरी तालुक्यातील वाघाला वडी या परिसरात स्थानिक नदी-नाल्यांना पूर आला आहे. ज्यामुळे अनेक लोक या पुराच्या पाण्यात अडकले आहेत. ज्यामुळे रहदारी ठप्प झाली आहे. त्याप्रमाणेच पालम तालुक्यातील लेंडी नदीला देखील पूर आल्याने पालम शहराजवळ सहा ते सात खेड्यांचा संपर्क तुटला आहे. या शिवाय गंगाखेड तालुक्यातील इंद्रायणी नदीला पूर आल्याने सायला, सूनेगाव, मुळा, नागठाणा, धारखेड या गावांची रहदारी पूर्णतः ठप्प झाली होती.
दरम्यान, परभणी जिल्ह्यात मागच्या 24 तासांत 50 मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर यामध्ये सेलू तालुक्यात 72, पाथरी 83 आणि मानवत तालुक्यात 77 मिमी पाऊस झाल्याने या ठिकाणी अतिवृष्टी नोंदवण्यात आली आहे. विशेष म्हणजे परभणी आणि जिंतूर तालुका सोडल्यास इतर सातही तालुक्यांमध्ये 100 टक्क्यांवर पावसाची नोंद झाली आहे. पालम व पाथरी तालुक्यात तर तब्बल 117 टक्के पाऊस पडला आहे. यामुळे या दोन्ही तालुक्यांमधील नदी-नाले ओवरफ्लो झाले आहेत. पावसाळा संपल्यानंतरही ऑक्टोबर महिन्यात तब्बल तीनशे टक्के परतीचा पाऊस पडला आहे. ऑक्टोबर महिन्यात सरासरीच्या तब्बल 161 मिलिमीटर पाऊस पडल्याने परभणी जिल्ह्याचा पाऊस 96 टक्क्यांवर गेला आहे. काल (शुक्रवारी) दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. ज्यामुळे जिल्ह्यातील पावसाची सरासरी आज (शनिवारी) सकाळपर्यंत शंभर टक्के व त्याहून अधिक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान होत असल्याने पंचनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. गेल्या काही दिवसात जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. तर दिवाळीच्या तोंडावर पडणाऱ्या पावसामुळे उत्सवाचाही बोजवारा उडाला.