परभणी - गेल्या काही दिवसात परभणी शहर तसेच जिल्ह्यात वाढणाऱ्या कोरोना बाधितांच्या संख्येमुळे शासनाने दोन दिवसांसाठी संचारबंदी करण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात आज जिल्ह्याचे पालक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबईत ही घोषणा केली आहे. त्यानुसार आज (शुक्रवारी) रात्री बारा वाजल्यापासून सोमवारी पहाटे सहा वाजेपर्यंत परभणीत शहर महापालिकेच्या 5 किलोमीटर हद्दीत तसेच जिल्ह्यातील अन्य 8 नगरपालिकांच्या क्षेत्रासह 3 किलोमीटर परिसरात ही संचारबंदी राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली आहे.
परभणी शहर तसेच जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी अनेक बाबींवर प्रतिबंध लावला आहे. ज्यामध्ये धार्मिकस्थळे बंद करण्यात आली असून काही काळ विदर्भातील वाहतूक देखील बंद करण्यात आली होती. शाळा बंद करण्यात आल्या आहेत. शिवाय शहरातील लग्नकार्य, मोर्चे, निदर्शने आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांवर देखील बंदी आणण्यात आली आहे. मात्र असे असले तरी गेल्या काही दिवसात कोरोनाबधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शासनाशी समन्वय साधून लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला.
संचारबंदी दरम्यान काय राहणार बंद काय असणार सुरू -
या संचारबंदी दरम्यान सर्व प्रकारच्या अस्थापना, कारखाने, दुकाने, व्यवसाय आणि खासगी कार्यालये बंद राहणार आहेत. मात्र शासकीय कार्यालय आणि त्यांच्या वाहनांना सूट देण्यात आली आहे. शिवाय सरकारी, खाजगी दवाखाने, औषधी दुकाने, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, लसीकरण केंद्र आणि कोरोनाच्या चाचण्या करणारे केंद्र सुरू राहणार आहेत. याशिवाय अत्यावश्यक सेवांचे परवाने घेतलेल्या व्यक्ती आणि वाहनांना सूट देण्यात आली आहे. तसेच माध्यम प्रतिनिधी आणि दैनिकांच्या वितरकांना देखील सूट आहे. याप्रमाणेच पेट्रोल पंप, गॅस वितरक आणि दूध विक्रेते यांना सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत सूट देण्यात आली आहे. याप्रमाणेच परीक्षेसाठी जाणारे विद्यार्थी आणि शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेसला या संचारबंदीतून सुटणार आहे.
हे ही वाचा - पालघर : जव्हारमधील आश्रमशाळेतील 38 मुलांना कोरोना संसर्ग; 3 तीन शिक्षकांचाही समावेश
394 कोरोनाबाधितांवर उपचार -
दरम्यान, परभणी शहरासह जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळपर्यंत 82 व्यक्ती कोरोनाबाधित आढळले होते. तर एका कोरोनाबाधित पुरूषाचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षात 394 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत जिल्ह्यातील 340 कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत 9 हजार 99 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या असून, त्यापैकी 8 हजार 365 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत.
हे ही वाचा - आता मराठीतून ऐकायला येणार आयपीएलची कॉमेंट्री!
1 लाख 37 व्यक्तींच्या तपासण्या -
जिल्हा रुग्णालयातर्फे आतापर्यंत 1 लाख 37 हजार 565 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात 1 लाख 27 हजार 887 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर 8 हजार 946 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह आहेत. 592 अनिर्णायक व 140 नमुने नाकारले गेले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली आहे.
हे ही वाचा - आता टी-२० मालिकाविजयाचे लक्ष्य! भारत-इंग्लंडमध्ये आज पहिली टी-२० लढत
'लॉकडाऊन'ची घोषणा मुंबईत -
दरम्यान, पालक मंत्री नवाब मलिक यांनी यासंदर्भात वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. ज्यामध्ये त्यांनी परभणीत वाढणाऱ्या कोरोना बाधितांचे संख्या मुळे लॉकडाऊनची आवश्यकता निर्माण झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याशी चर्चा करून आपण हा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यानुसार आज (शुक्रवारी) रात्री बारा ते सोमवारी पहाटे सहा वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी एका पत्राद्वारे प्रसारमाध्यमांना दिली आहे. या काळात नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.