परभणी - नोकरीच्या निमित्ताने परभणीतून बाहेर आणि बाहेरच्या जिल्ह्यातून परभणी जिल्ह्यात येणे-जाणे (अपडाऊन) करणाऱ्या शासकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांना जिल्ह्यातून बाहेर जाण्यास व जिल्ह्यात प्रवेश करण्यास रविवार (3 मे) पर्यंत बंदी घालण्यात आली आहे. सध्या लागू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी हे आदेश जारी केले आहेत.
कोरोना विषाणूचा संसर्ग आजूबाजूच्या जिल्ह्यात झाला आहे. त्यामूळे खबरदारी म्हणून परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे बाहेर जिल्ह्यातून परभणी जिल्ह्यात येणे-जाण्यापासून रोखणे आवश्यक आहे. यावर उपाययोजना म्हणून जिल्ह्यात बाहेरुन जे अधिकारी - कर्मचारी जिल्ह्यात ये-जा (अपडाऊन) करतात, असे अधिकारी- कर्मचारी अनेक व्यक्ती, नागरिक, प्रवासी यांच्या संपर्कात येवून परजिल्ह्यातून कोरोना विषाणूचा संसर्ग, प्रादुर्भाव या जिल्ह्यात पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांना जिल्हा प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे.
विशेष म्हणजे, या आदेशाचे पालन न करता अनधिकृतपणे जिल्ह्यात ये-जा केल्यास साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंडसंहिता 1860 चे कलम 188 नुसार गुन्हे दाखल होऊन कारवाई करण्यात येणार आहे. सदर आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सर्व कार्यालयांच्या विभागप्रमुखावर राहील, असेही जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.