परभणी - जिंतूरमधील राष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांनी नगर परिषदेतील कर निरीक्षक दत्तराव तळेकर यांना घरी बोलावून मारहाण केली. त्याच्या निषेधार्थ संभाजी सेनेच्यावतीने बेमुदत उपोषण करण्यात आले. आमदारांनी तळेकर यांच्यावरच खोटी अॅट्रॉसिटी दाखल केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यामुळे आमदार भांबळे यांना अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
राष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांनी जिंतूर नगर पालिकेतील कर निरीक्षक दत्तराव तळेकर यांना गेल्या शुक्रवारी घरी बोलावले. त्यानंतर त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. मात्र, या तक्रारीवरून गुन्हा दाखल न करता उलट आमदार भांबळे यांच्या सांगण्यावरून दत्तराव तळेकर यांच्यावर खोटी अॅट्रॉसिटी दाखल करण्यात आली असल्याचा आरोपी संभाजी सेनेने केला आहे. त्यामुळे दत्तराव तळेकर आणि त्यांचे कुटुंबीय प्रचंड भयभीत झाले आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे आता संभाजी सेनेचे कार्यकर्ते बेमुदत उपोषणाला बसले आहेत.
आमदार भांबळे यांनी यापूर्वी देखील शासकीय कर्मचाऱ्यांना धमक्या दिल्या आहेत. त्यामुळे तालुक्यात आणि कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांना वेळीच आवर घालण्यात यावा. तसेच त्यांना अटक करण्यात यावी. त्यांच्या सांगण्यावरुन करण्यात आलेली खोटी अॅट्रॉसिटी रद्द करावी, या प्रमुख मागण्यांसाठी हे बेमुदत उपोषण करण्यात आले. या आंदोलनात संभाजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर, अरुण पवार, राजेश बालटकर आदी सहभागी झाले होते.