परभणी - कोरोनाच्या साथीला आटोक्यात आणण्यासाठी राज्यातील वैद्यकीय कर्मचारी, आशा सेविका, स्वच्छता कर्मचारी आणि पोलीस खाते अहोरात्र झटत आहेत. या सर्व कोरोना योद्ध्यांचा सन्मान करणे आवश्यक आहे. या काळात त्यांचे वेतन कपात केली जात असल्यावरून सेलू-जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी संताप व्यक्त केला. या योद्ध्यांचे वेतन कपात न करता त्यांना विशेष प्रोत्साहन भत्ते दिले जावेत, अशी मागणी आमदार बोर्डीकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
या संदर्भातील निवेदनात बोर्डीकर यांनी म्हटले आहे की, कोरोना साथीचा राज्यात उद्रेक झालेला आहे. त्याचा प्रतिबंध करण्यासाठी अनेक योद्धे आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र परीश्रम घेत आहेत. यात वैद्यकीय क्षेत्र, आशा सेविका, स्वच्छता कर्मचारी आणि पोलीस खाते आघाडीवर आहे. या योद्धयांचा सन्मान करणे, त्यांना अधिक काम करण्यासाठी प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. पण, असे होताना दिसत नाही. उलट या योद्ध्यांची वेतन कपात केली जात असल्याच्या बातम्या येत आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे. या योद्ध्यांच्या वेतन कपातीऐवजी त्यांना या काळात प्रोत्साहनपर अधिक वेतन, भत्ते देणे गरजेचे आहे. तरी या संदर्भात आवश्यक ती पावले उचलून वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी व तसेच पोलीस विभाग यांना प्रोत्साहन पर भत्ता देण्याची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी आज गुरुवारी आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.