परभणी - शहरात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात 20 डिसेंबर रोजी काढण्यात आलेल्या मोर्चानंतर काही दंगेखोरांनी दगडफेक केली होती. यामध्ये अनेक दुकाने, घरे, दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले. तसेच दगडफेकीच्या भीतीने महामंडळाच्या बस धावल्या नाहीत. त्यामुळे शहरातील तीनही पोलीस ठाण्यांतर्गत 9 लाख 99 हजार 905 रुपयांचे नुकसान झाले असून ते नुकसानीची रक्कम दंगेखोरांकडून वसूल करण्याचा प्रस्ताव पोलीस प्रशासनाने जिल्हाधिकार्यांकडे पाठवला आहे.
यासंदर्भात पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार परभणीत 'एनआरसी' व 'सीएए'च्या विरोधात 20 डिसेंबरला मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा सुरू होण्यापूर्वी काही दुकाने जबरदस्तीने बंद करण्यावरुन वाद घालून दुकानांवर दगडफेक केली होती. मोर्चा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आल्यानंतर मोर्चातील काही लोकांनी दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये अग्नीशमनच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. तसेच दुकाने, घरे, वाहने यांच्यावरही दगडफेक करुन नुकसान केले. त्यानुसार शहरातील नानलपेठ पोलीस ठाण्यात 2, कोतवालीत 2 आणि नवामोंढा पोलीस ठाण्यात 1 गुन्हा दाखल झाला आहे. या आंदोलनादरम्यान मोर्चामधील लोकांनी शासकीय तसेच खासगी गाड्यांचे, दुकानांचे दगडफेक करुन नुकसान केले. यात नानलपेठ हदीत 3 लाख 19 हजार रुपयांचे तर नवामोंढा हद्दीत 5 लाख 70 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे .
तसेच एसटी आगार व्यवस्थापकांनी बसेस अचानक बंद केल्यामुळे परभणी आगाराच्या 82 फेऱ्या रद्द झाल्याने 1 लाख 10 हजार 905 रुपयांचे नुकसान झाल्याचे कळविले आहे. असे एकुण 9 लाख 99 हजार 905 रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान, पोलिसांनी बेकायदेशिर जमवातील ज्या आरोपींनी प्रत्यक्ष दगडफेकीमध्ये सहभाग घेवून सार्वजनिक मालमत्ता व खासगी मालमत्तेचे नुकसान केले आहे, अशा आरोपींकडूनही नुकसान भरपाई मुंबई पोलीस कायदा कलम 51 प्रमाणे वसूल करुन बाधीत झालेल्या व्यक्तींना नुकसान भरपाई मिळावी, म्हणुन जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांना प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे सांगितले आहे.
हेही वाचा - शाळा भरली रेल्वेच्या डब्यात; शैक्षणिक गोडीसाठी पालमच्या आडगाव शाळेत अनोखा उपक्रम