परभणी - पूर्णा तालुक्यातील ३०६ शेतकऱ्यांच्या नावाने बनावट खाते तयार करून प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेच्या माध्यमातून ३० लाख रुपयांच्या अनुदानाचे अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पूर्णा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. कृषी सहायक श्याम यशमोड आणि हरीश वंजे, अशी या आरोपींची नावे असून त्यांची सहा दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ठिबक सिंचन संच आणि त्यासाठी लागणारे अनुदान, अशी तरतूद आहे. मात्र, या योजनेंतर्गत कोणताही अर्ज केलेला नसताना देखील पूर्णा तालुक्यातील पिंपळा लोखंडे येथील शेतकरी सूर्यभान गंगाधर लोखंडे यांच्या नावाचे बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. तसेच या माध्यमातून संच व त्यासोबत मिळणारे २४ हजार ९८० रुपयांचे अनुदान परस्पर उचलल्याचा प्रकार मागील वर्षी उघडकीस आला होता.
या प्रकरणी सूर्यभान लोखंडे यांनी परभणी येथील उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. यानुसार पूर्णा पोलीस ठाण्यात जून २०१८ मध्ये अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार यांनी यासंदर्भात सखोल तपास केला असता, पूर्णा तालुक्यात या योजनेंतर्गत अशाच पद्धतीने ३०६ शेतकऱ्यांचे बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. तसेच ताडकळस येथील बँकेत बनावट खाते उघडून तब्बल तीस लाख रुपयांचे अनुदान परस्पर लंपास केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर कृषी सहायक श्याम यशमोड आणि त्याचा सहकारी हरीश वंजे या दोघांना पोलिसांनी अटक केली. या दोघांनाही न्यायालयात हजर केले असता, त्यांची सहा दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, हे एक मोठे रॅकेट असून यात अजून काही मंडळी सहभागी असल्याची शक्यता आहे. तसेच या प्रकरणात मोठा गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामार्गाने पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.