परभणी : गुन्हेगारांशी संबंध ठेवणे, गुन्ह्यांच्या प्रकरणात त्यांना मदत करणे, असे विविध आरोप असणाऱ्या परभणी पोलीस दलातील 4 पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी निलंबित केले आहे. याशिवाय एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला देखील बडतर्फ करण्यात आले. या कारवाईने परभणीच्या पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून, पोलीस अधीक्षकांच्या कठोर शिस्तीची देखील चर्चा होत आहे.
परभणी पोलीस दलातील निलंबित करण्यात आलेले पोलीस कर्मचारी सुरेश डोंगरे, शरद मुलगिर, विशाल वाघमारे व उध्दव सातपुते हे स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत होते. या चार पोलिसांवर जिंतूर येथील गुन्हेगारांशी हितसंबंध ठेवल्याचा आरोप आहे. त्यांनी जिंतुर येथील अट्टल गुन्हेगार सुरेश जैस्वाल याच्याशी नियमितपणे मोबाइलवर संपर्क ठेवला. त्याच्या गुन्हेगारीची प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे पाठराखण केली. त्यामुळे सुरेश डोंगरे, शरद मुलगिर, विशाल वाघमारे व उध्दव सातपुते या तिघा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या तिघांनी कर्तव्यात कसूर करून बेकायदेशीर, बेशिस्त, बेजबाबदार, संशयित, विपर्यंस्त, हेकेखोर वर्तणूक केले. तसेच नैतिक अंधःपतनाचे गैरवर्तन केल्याचाही त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.
विशेष म्हणजे याच प्रकरणात पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हनुमंत कच्छवे यांच्याविरूध्द जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा झाल्यानंतर पाठोपाठ पोलीस अधीक्षकांनी त्यांना बडतर्फ केल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून मिळाली आहे. त्यामुळे पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली असून, बेशिस्त कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. तसेच पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या कर्तव्यकठोर भूमिकेची देखील पोलिसांसह सर्वसामान्य जनतेत चर्चा होताना दिसून येत आहे.
"इतर दोघांवरही कारवाई"
याशिवाय परभणी पोलीस नियंत्रण कक्षातील पोलीस नाईक सुरेश सटवाजी पानझडे यांना वारंवार गैरहजर राहिल्याबद्दल पोलीस अधीक्षकांनी दोनच दिवसांपूर्वी शासकीय सेवेतून सक्तीने सेवानिवृत्त केले आहे. तर, दोन आठवड्यांपूर्वी गंगाखेड पोलीस ठाण्यात एका पोलीस कर्मचाऱ्याला 1 हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. त्या कर्मचाऱ्याविरोधात गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्या तिसऱ्याच दिवशी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी त्या कर्मचाऱ्याला पोलीस खात्याची प्रतिमा मलिन केल्याबद्दल शासकीय सेवेतून बडतर्फ केले.