परभणी - येथील महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी (सोमवार) उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. ज्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप या तीनही पक्षांच्या उमेदवारांनी चार अर्ज दाखल केले, तर उपमहापौर पदासाठी देखील तिन्ही पक्षाच्या 5 जणांचे अर्ज आले आहेत. दरम्यान, महापालिकेत काँग्रेसची सत्ता असून यावेळी देखील त्यांचा महापौर विराजमान होण्याची शक्यता आहे. वाटाघाटीत उपमहापौरपद हे मात्र राष्ट्रवादीच्या वाट्याला जाऊ शकते, असे चित्र आहे.
परभणी महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक प्रक्रिया सुरू असून उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटच्या दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले. यामध्ये काँग्रेसच्यावतीने अनिता सोनकांबळे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने डॉ.वर्षा खिल्लारे, गवळणबाई रोडे आणि भारतीय जनता पक्षाच्यावतीने मंगला मुद्गलकर यांनी अर्ज दाखल केले. उपमहापौर पदासाठी काँग्रेसच्यावतीने भगवान वाघमारे, महेबुब खान, राष्ट्रवादीच्यावतीने महेबुब अली पाशा व अली खान आणि भारतीय जनता पक्षाच्यावतीने मुकूंद खिल्लारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
काँग्रेसचे उमेदवारी अर्ज दाखल करतांना जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरपूडकर, माजी आमदार सुरेश देशमुख, माजी खासदार तुकाराम रेंगे, रविराज देशमुख, तालुकाध्यक्ष पंजाब देशमुख, शहराध्यक्ष नदीम इनामदार तर राष्ट्रवादीच्या उमदेवारासोबत विरोधी पक्षनेते विजय जामकर, गटनेत्या चांद सुभाना जाकेरलाला, एसएम अली पाशा, जलालोद्दीन काजी, मोहम्मद नईम, अली खान, शंकर भागवत, बाळासाहेब बुलबुले, व्यंकट शिंदे आणि भाजपा उमेदवारासोबत सुनिल देशमुख, रितेश झांबड, उषा झांबड, संतोषी देशमुख आदी उपस्थित होते.
"महापालिकेतील पक्षीय संख्यबळ आणि सत्तेचे सूत्र" -
परभणीचे महापौर पद अनुसूचित जातीसाठी आरक्षित असून येत्या 22 नोव्हेंबरच्या आत नवीन महापौरांची नियुक्ती केली जाणार आहे. या पदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडे उमेदवार उपलब्ध असून त्यांनी फिल्डिंग लावली आहे.
65 सदस्यीय परभणी महापालिकेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसचे 30 सदस्य असून, त्या खालोखाल राष्ट्रवादीचे 19, भाजप 8, शिवसेना 5, एमआयएम 1 आणि इतर 2 सदस्य आहेत. प्रथमच अनुसूचित जातीची महिला परभणीच्या महापौरपदी विराजमान होणार आहे. महापालिकेत सत्ताधारी असलेल्या काँग्रेसकडे अनुसूचित जातीच्या महिला उमेदवार उपलब्ध आहेत. अनिता रवींद्र सोनकांबळे या काँग्रेसकडून निवडून आलेल्या एकमेव उमेदवार असून, त्यांची या पदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे.
महापालिकेत दुसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे देखील डॉ.वर्षा संजय खिल्लारे या उमेदवार आहेत. त्या देखील महापौर पदी विराजमान होण्यासाठी तन-मन-धन लावून प्रयत्न करतील.मात्र, राज्यात सर्वत्र आघाडीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने याठिकाणी महापौरपदासाठी काँग्रेसला पाठिंबा दिल्यास उपमहापौर म्हणून राष्ट्रवादीच्या उमेदवारांची वर्णी लागू शकते. मात्र, भाजपने मागच्यावेळी वरपूडकर यांना महापौर पदासाठी पाठिंबा दिल्याने त्यांचा उपमहापौर होतो की काय ? अशी शक्यता निर्माण झाली आहे. कारण उपमहापौर पदासाठी भाजपचे मुकूंद खिल्लारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे पाच सदस्य असलेली शिवसेना मात्र या प्रक्रियेपासून दूर आहे. शिवसेनेच्या कुठल्याही सदस्याने अर्ज केलेला नाही.