परभणी - कोरोनाची लागण झालेला पोलीस कर्मचारी आढळून येताच परभणी महापालिकेने शहरातील नानलपेठ पोलीस ठाणे सील केले. आता त्या पाठोपाठ जिंतूर तालुक्यातील बोरी पोलीस ठाण्यातील महिला कोरोनाबाधित आढळून आली आहे. या पार्श्वभूमीवर बोरी पोलीस ठाणे देखील सील करण्याची कारवाई करावी लागणार आहे. दरम्यान, सध्या बोरी पोलीस ठाण्यात निर्जंतुकीकरणाचे काम सुरू केले आहे.
परभणीत सोमवारी आलेल्या अहवालात नानलपेठ पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याचा अहवाल पोझिटीव्ह आल्यानंतर संपूर्ण पोलीस प्रशासन हादरून गेले. महापालिका प्रशासनास सूचना मिळाल्याबरोबर अधिकार्यांसह कर्मचार्यांनी प्रथम नानलपेठ भागातील पोलीस वसाहतीत धाव घेतली. कर्मचारी राहत असलेल्या बिल्डींग क्रमांक 19 चा संपूर्ण परिसर निर्जंतुकीकरण करून घेतला. पाठोपाठ नानलपेठ पोलीस ठाण्याचाही संपूर्ण परिसर सीलबंद केला. ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच बॅरिकेड्स लावून प्रशासनाने तेथील ये-जा थांबविली. या भागात फवारणीचे काम प्रशासनाने पूर्ण केले. तर पोलीस ठाण्यातील 18 कर्मचारी शहरातील अक्षदा मंगल कार्यालयात क्वारंटाईन करण्यात आले आहेत. मात्र या ठिकाणी सदर कर्मचाऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची बाब समोर आली आहे.
बोरी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस शिपाई आढळली कोरोनाबाधित
मंगळवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात जिंतूर तालुक्यातील बोरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेली एक महिला कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आली आहे. सदर महिला स्वतः हून परभणीच्या जिल्हा रुग्णालयात आली होती. त्या ठिकाणी तिने स्वॅब नमुने तपासणीसाठी दिले होते. त्यानंतर दोन दिवसांनी आलेल्या या अहवालात ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. त्यामुळे सध्या बोरी पोलीस ठाण्यात निर्जंतुकीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. तर वेळ पडल्यास पोलीस ठाणेदेखील सील करण्यात येऊ शकते. दरम्यान पोलीस दलामध्ये देखील कोरोनाचा शिरकाव झाला असून, यामुळे रस्त्यावर उभे राहून कोरोना लढाईत सहभागी पोलिसांचे मनोबल खचू शकते. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडतात पोलीस तसेच आरोग्य प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन सर्व स्तरातून होत आहे.